जळगाव : मोटार सायकल चोरी करुन लोकांकडे गहाण ठेवून त्या माध्यमातून पैसे जमा करणा-या अट्टल मोटार सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरीफ शरिफ तडवी (24) रा.गणेश नगर पहूर ता.पाचोरा जि. जळगाव आणि चेतन संजय चव्हाण (23) रा.लोहारा ता.पाचोरा जिल्हा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
चोरीच्या मोटार सायकली चोरुन त्या गहाण ठेवून पैसे मिळवणा-या चोरट्यांची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांना पहुर येथे रवाना केले होते. आरिफ शरीफ तडवी हा तरुण मोटार सायकल चोरत असल्याच्या माहीतीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चेतन संजय चव्हाण या त्याच्या साथीदाराचे नाव पुढे आले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला.
दोघा मोटार सायकल चोरट्यांच्या ताब्यातून 5 लाख 15 हजार रुपये किमतीच्या एकुण 19 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. दोघा चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या व त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलच्या माध्यमातून एकुण सोळा गुन्हे उघडकीस आले आहेत. पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल 8, जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल 3, जामनेर 2, पिंपळगाव 2 व पहुर येथील 1 असे एकुण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सफौ. अशोक महाजन, सफौ. रवि नरवाडे, पो.हे.कॉ महेश महाजन, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ उमेशगीरी गोसावी, पो.कॉ ईश्वर पाटील, पो.कॉ हेमंत पाटील, चालक पो.हे.कॉ दिपक चौधरी, चालक पो.ना मुरलीधर बारी, चालक पो.ना अशोक पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.