मंगळवेढा : गुप्तधन मिळण्याच्या आशेने गुप्त पूजा पाठ घरमालकासह दोघा मांत्रिकांना महागात पडली. गुप्तधनासाठी घरातील खोदकाम करणाऱ्या दोघा मांत्रिक घरमालकासह तिघांना मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवेढा शहरातील इंगळे गल्लीत काही नागरिकांच्या सतर्कतेने मांत्रिकाची ‘करणी’ प्रकाशात आली. मंगळवेढा शहरातील इंगळे गल्लीच्या जुन्या वाडयात अमावास्येच्यातोंडावर सोन्याचा हंडा असल्याच्या भावनेतून तिघे खोदकाम करत होते. खोदकामाच्या आवाजाने गल्लीतील नागरिक जागे झाले.
आवाजाच्या दिशेने वाडयात सर्वांनी डोकावून पाहिले. त्यावेळी मांत्रिकासहइतर दोघे जण खड्डा खोदून पूजा अर्चा करत होते. या घटनेची माहिती सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना कळवली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पॉलिसी खाक्या दाखवला असता खरा प्रकार उघड झाला.शहरातील इंगळे गल्लीत गेल्या काही वर्षापासून जुना वाडा असून तो बंद स्थितीत आहे.
या वाडयात मंगळवेढा येथील एक स्थानिक व्यक्ती, श्रीगोंदा येथील एक व अहमदनगरची एक असे खोदकाम करत होते. सोन्याचा हंडा असल्याच्या संशयातून व भावनेतून ते खोदकाम करत होते.बंद वाडयातून खोदकामाचा आवाज येवू लागल्याने शेजारच्या लोकांना संशय आला. त्यांनी घरावर चढून वाकून पाहिले. त्यावेळी त्यांना अंदाजे ५ फुट खोल खड्डा दिसून आला. जवळच फोडलेले नारळ, हळदी-कुंकू, इतर विधी साहित्य दिसून आले.
कुलूपबंद वाड्याच्या बाहेर एक जण पहारा देत होता.नागरिकांची पोलिस स्टेशनला तक्रार आल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी तिघांना पोलिस स्टेशनला चौकशी कामी आणले. दरम्यान पहारा देणारा पसार होण्यात यशस्वी झाला.पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी या तिघांची चौकशी केली. २० जुलै रोजी अमावास्या असल्याने अमावास्येच्या तोंडावर या जागी सोन्याचा हंडा असल्याच्या त्यांना संशय होता.
या संशयी भावनेतून त्यांनी ही खोदाई सुरू केली होती.नंदूर व माचणूर येथे काही वर्षापुर्वी नरबळीचा प्रकार अमावास्येच्या वेळी घडला होता. माचणूर येथील प्रकरण अजून ताजेच आहे.सोन्याच्या हंडयाच्या लालसेपोटी अंधश्रध्देतून हे खोदकाम सुरु होते.लॉकडाऊन काळात पर जिल्हयातून मांत्रिकाने येण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पोलिसांनी घरमालक, मध्यस्थ, मांत्रिक व खोदकाम करणारे अशासर्वांच्या विरोधात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हादाखल करावा अशी मागणी होत आहे.