वाहनाची हौस भारी – चालकास संपवून तुरुंगवारी
बीड : मोह हा केव्हाही वाईटच असतो. मोह हे नेहमीच दुखा:चे कारण असते. कुठल्याही गोष्टीचा मोह एका विशिष्ट पातळीवर आवरता आला पाहीजे. नाहीतर माणसाचा संयम ढळतो आणि मग जे होते ते आक्रित. एरॉनॉटिकल अभियंता बनून अवकाश सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थ्यालाही वाहनांचा मोह नडला. गाड्यांचे क्रॉस मॉडेल तयार करण्याच्या नादात त्याने आपल्या शैक्षणिक जीवनाची ‘लाईन क्रॉस’ केली. वाहनाचे खूळ डोक्यात बसलेल्या या विद्यार्थ्याचा हट्ट पुरविण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. आपली हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क गुन्हेगारी मार्ग अवलंबविला. भाड्याची जीप घेऊन चालकास संपवून ती पळविण्याचा सुनियोजित कट त्याने रचला. पण जीपचे टायर फुटले आणि इंधनही संपले. त्यामुळे सारा ‘प्लॅन’ विस्कटला. पोलिसांनी कुठलाही सुगावा नसताना तपासाची कडी जुळवली आणि विद्यार्थ्यासह त्याचे दोन मित्र असे त्रिकूट गजाआड केले..
बीड-परळी राज्यमार्गावरील सिरसाळा (ता. परळी) या गावापासून पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर कावळ्याचीवाडी गाव आहे. कावळ्याचीवाडी पासून पुढे धारूर तालुक्यातील म्हातारगावला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर १० डिसेंबर २०१५ रोजी सकाळी ७ वाजता पांढऱ्या रंगाची जीप (क्र. एमएच २४ व्ही- ५१४८) उभी होती. या जीपचे टायर फुटलेले होते. समोरील आणि पाठीमागील नंबरप्लेट तुटलेल्या होत्या. बेवारस जीप काही तरी भेसूर चित्र दर्शवत होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनाही ही जीप कशामुळे उभी आहे? हे कळत नव्हते. तास-दोन तास उलटल्यानंतरही गाडी जागेवरच असल्याने अखेर गावातील काही जागरुक ग्रामस्थांनी जीपजवळ जाऊन पाहणी केली. तेव्हा पाठीमागील सीटजवळील जागेत त्यांना एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. गावकऱ्यांनी तातडीने ही माहिती परळी ग्रामीण ठाणे व सिरसाळा पोलिसांना दिली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी तेथे मोठी गर्दी केली. घटनास्थळ परळी ग्रामीण ठाणे हद्दीत असले तरी सिरसाळा ठाणे जवळ असल्याने हद्दीचा विचार न करता सिरसाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकांत डोंगरे तेथे काही मिनिटांतच पोहोचले. गर्दी पांगवून त्यांनी प्राथमिक माहिती जाणून घेतली. पाठोपाठ उपअधीक्षक राहुल धस, परळी ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्याने रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेह विजय सखाराम यमगर (३०, रा. दगडवाडी, ता. परळी) यांचा असल्याचे पोलिसांनी व ग्रामस्थांनी ओळखले. त्याचे कारण हे होते की, विजय यमगर यांची जीप परळी ग्रामीण ठाण्याकडे विधानसभा, लोकसभा निवडणुकीवेळी भाड्याने होती.
सुस्वभावी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या विजयला कुणी संपवू शकते? याची कल्पनाही करवत नव्हती. विजय सखाराम यमगर (३०) यांचा मृतदेह त्यांच्याच जीपमध्ये आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलीसही हादरून गेले होते. लूटमार करताना ही घटना घडली की, कुणी त्यांना थंड डोक्याने संपविले? याचे गूढही उकलण्यास तयार नव्हते. बीडहून दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव व संदीप सावळे तसेच कर्मचारीही या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तेथे पोहोचले. अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, विजय कबाडे, अंबाजोगाईचे उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव व संदीप सावळे यांची दोन पथके कामाला लागली. पोलिसांनी मयत विजय यमगर यांच्या मोबाइलचा सीडीआर तपासून त्यातील शेवटचा कॉल कुणाचा होता याची माहिती घेतली तेव्हा तो सुदर्शन हंडे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ज्या क्रमांकावरून फोन आला तो क्रमांक सुदर्शन यांच्या नावावर त्याचा मित्र कृष्णा अच्युत मुंडे (२२, रा. नागपिंप्री, ता. अंबाजोगाई) हा वापरत असल्याचे समोर आले.
त्यावरून कृष्णाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला आढेवेढे घेतले. परंतु पोलिसांनी त्याला आपल्या पध्दतीने बोलते केले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. कृष्णा मुंडे याचा मित्र बालाजी भीमराव जाधव (२१.रा. तडोळी, ता.परळी) हा एरॉनॉटिकल अभियांत्रिकीचे अंबाजोगाईत शिक्षण घेतो. त्याला वाहनांची भारीच हौस होती. तांत्रिक बाबींमध्ये या तो अतिशय हुशार आहे. हेलिकॉप्टरच्या धर्तीवर त्याने आपल्या घरी रायडर बनविले आहे. शिवाय देशी पिस्तूलचे साचेदेखील तो बनवतो. वाहनांचे क्रॉस मॉडेल बनविण्यासाठी त्यास एक जीप हवी होती. त्याने कुटुंबीयांकडे त्यासाठी हट्ट धरला. मात्र, कुटुंबीयांनी जीप घेऊन देण्यास नकार दिला.
बालाजी जाधव व कृष्णा मुंडे यांचा अनेक वर्षांचा कौटुंबीक स्नेह आहे. त्या दोघांच्या वडिलांचीही घट्ट मैत्री आहे. बालाजी जाधव यास महाविद्यालयात काही अडचण आली तर कृष्णा मुंडेला बोलावून घेत समोरच्याला धाकात ठेवत असे. कृष्णा मुंडेही त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असे. बालाजी जाधवने त्यास मला एक जीप हवी आहे, त्यासाठी तुझी मदत लागेल, असे सांगितले होते.
बालाजीकडे भन्नाट ‘प्लॅन’ होता, तो त्याने कृष्णाला समजावून सांगितला. मात्र, हा ‘प्लॅन’ गुन्हेगारी मार्गाकडे नेणारा आहे, हे त्या दोघांनाही कळाले नाही. उलट मदतीला त्यांनी तिसरा मित्र सतीश भागवत पवार (२२,रा. डोंगरपिंपळा, ता.अंबाजोगाई) यास कटात सामील करून घेतले. किरायाने जीप घ्यायची आणि वाटेत चालकास संपवायचे. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि पुण्याला पळून जायचे असा ‘प्लॅन त्यांनी आखला होता.
त्यानुसार ९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री सहा वाजता कृष्णा मुंडे आणि बालाजी जाधव हे दोघे परळीत दाखल झाले. परळीतील मोंढा भागात खासगी कार व जीपचे थांबण्याचे ठिकाण आहे. तेथून कुठलीही एक जीप किरायाने घ्यायची आणि आपले इप्सित साध्य करायचे, असा त्यांचा बेत होता. त्यावेळी नेमके विजय यमगर हे प्रवाशाची प्रतीक्षा करत तेथे थांबलेले होते. गावाकडे जाताना किराया मिळाला तर चार पैसे पदरात पडतील, अशी त्यांची अपेक्षा होती.
कृष्णा मुंडे व बालाजी जाधव यांनी त्यांना अंबाजोगाईला एका रुग्णाला भेटण्यासाठी स्वाराती रुग्णालयात जायचे आहे, असे सांगून जीप किरायाने घेतली. विजय यमगरने दोन हजार रुपये किराया सांगितला. त्यावर कृष्णा मुंडेने १७०० रुपये देतो, असे सांगितले. मात्र, विजय यमगर हे दोन हजार रुपयांवर अडून बसले. अन्यथा दुसरी जीप शोधण्यास सांगितले. अखेर दोन हजार रुपये न देण्याचे मान्य केल्यानंतर ते अंबाजोगाईला निघाले. अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयातील पाकिंगमध्ये जीप उभी करायला लावून कृष्णा मुंडे व बालाजी जाधव हे आत गेले. खरे तर त्यांना कोणा रुग्णाला भेटायचे नव्हते. चालकास कशा पध्दतीने, कुठे संपवायचे आणि तिसरा साथीदार सतीश भागवत पवार (२२, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई) याला सोबत कसे घ्यायचे याबाबत चर्चा करायची होती.
गाडीतून उतरताना कृष्णा मुंडे याने चालक विजय यमगर यांचा मोबाइल क्रमांक घेतला होता. खलबते केल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले. कृष्णा मुंडे याने जीप घेऊन येण्याचा निरोप देण्यासाठी विजय यमगर यांना कॉल केला होता. त्यानंतर त्यांनी एका मित्राला भेटण्यासाठी डोंगरपिंपळा येथे गाडी घेण्यास सांगितले. साधारण आठ वाजेची ती वेळ होती. विजय यमगरला घराकडे जाण्याची ओढ होती. मात्र, तो किरायादेखील टाळू शकत नव्हता. त्याने जादा पैसे लागतील अशी अट घातली. त्यावर कृष्णा व बालाजी यांनी जादा पैसे देण्याची तयारी दर्शवली. जाताना त्यांनी दारूच्या बाटल्या सोबत घेतल्या. डोंगरपिंपळ्या येथे पोहोचल्यावर त्यांनी तेथील सतीश भागवत पवार यास बोलावून घेतले.
मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या एका शेतात निर्जनस्थळी अंधारातच ते ते दारू ढोसण्यासाठी बसले. यावेळी विजय यमगर हे आपल्या जीपमध्ये गाणी ऐकत बसले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास कृष्णा मुंडे, बालाजी जाधव व सतीश पवार यांनी विजय यमगर यांना येथेच संपविण्याचे ठरविले. त्यानुसार तिघेही मधल्या सीटवर बसले. विजय यमगर हे जीप सुरू करून निघण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून कृष्णा मुंडे याने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना मागील सीटवर टाकून कृष्णा मुंडे जीप चालविण्यास बसला. जीपच्या क्रमांकावरून ओळख पटू नये म्हणून त्यांनी समोरील व पाठीमागील नंबर प्लेट दगडाने तोडल्या.
सतीश पवार मात्र तेथूनच आपल्या घरी निघून गेला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कृष्णा मुंडे व बालाजी जाधव हे यमगर यांच्याच जीपमधून निघाले. वाघाळा शिवारात पोहोचल्यावर विजय यमगर हे जिवंत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा जीव जाईना म्हणून त्यांनी गाडी रस्त्यालगत उभी केली व विजय यांना खाली खेचले. त्यांना फरपटत जवळच्या शेतात नेऊन तेथे दगडाने ठेचले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा मृतदेह जीपमधील मागील सीटजवळ ठेवून ते निघाले. त्यांना मृतदेह नदीपात्रात फेकून पोबारा करायचा होता. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या जीपचे टायर फुटले. तशाही स्थितीत त्यांनी दोन किलोमीटरपर्यंत जीप आणली.
कावळ्याचीवाडी ते म्हातारगाव रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या गाडीतील इंधन संपले. मात्र, जीप इंधन संपल्याने बंद पडल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. कष्णाने आपल्या मित्राला ट्रॅक्टर घेऊन बोलावले. त्याने जीप ओढून सुरू करण्याचा प्रयत्न केला; परंतु जीप काही सुरू झाली नाही. तेथून जाणाऱ्या एका रिक्षावाल्याचीही त्यांनी मदत घेण्याचा प्रयत्न केला; परंतु इंधन संपल्याने जीप सुरू होणे अशक्य होते. अखेर मृतदेह जीपमध्ये ठेवून दोघांनीही सैरावैरा धावत आपापले गाव गाठले.
कृष्णा मुंडे पाठोपाठ पोलिसांनी बालाजी जाधवच्या मुसक्या आवळल्या. या दोघांच्या चौकशीतून हा सारा थरारपट उलगडला. अवघ्या १२ तासांत विजय यमगर यांच्या खुनाचा छडा लागला. दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनिरीक्षक संतोष जोंधळे व सहकाऱ्यांनी अंबाजोगाईतून सतीश पवार व त्यांच्या तिसऱ्या साथीदारास अंबाजोगाईतून अटक केली. बालाजी जाधव याच्या घराची दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव व संदीप सावळे यांनी झडती घेतली. त्याच्याकडे दोन गावठी कट्टे, ३ पुंगळ्या, गावठी कट्टा बनविण्यासाठीचे दोन लोखंडी भाग आढळून आले. शिवाय वाहनांच्या सुट्या पार्टपासून बनविलेले विविध उपकरणेदेखील आढळून आली. विजय यमगर यांचा खून केवळ जीपच्या हव्यासापायी केल्याची कबुली या तिघांनी दिली. अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात पार्किंगमधून गाडी काढण्यासाठी कृष्णा मुंडे याने विजय यमगर यांना केलेला एकमेव कॉल या रहस्यमय प्रकरणात आरोपींपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरला. मयत विजय यमगर यांचे बंधू नरेश उर्फ नरोबा सखाराम यमगर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
विजय यमगर हे दुर्दैवाने या तिघांच्या तावडीत सापडले आणि त्यांना हकनाक जीवानिशी जावे लागले. बालाजी जाधव याला गाड्यांचा मोह महागात पडला. वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बालाजी जाधववर कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. दोन मित्रांनाही त्याने अडचणीत आणले.