शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौ-या प्रसंगी त्यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरोधकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सोलापूरमधील कोरोनाची परिस्थिती समजून घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सोलापूर शहर, बार्शी, दक्षिण सोलापूर या भागातील कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली.
माजी मुख्य सचिव अजय मेहता यांना आपण सोलापूर जिल्हयाचा दौरा करण्यास सांगणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले. त्यांना याबाबत आढावा घेण्यास सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. काही लोकांना वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना दुरुस्त होईल. कोणत्या गोष्टींना किती प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोरोना संकटात सापडलेल्या रुग्णांना बाहेर काढायला हवे. राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना कदाचीत वाटत असावे. लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था पार खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यायला हवे असे मला वाटत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.