एकतर्फी प्रेमात अल्ताफ झाला होता दिवाना; विवाहीत वैष्णवीचा केला खून,साधला निशाना

जालना : वैष्णवी लग्नायोग्य झाली होती. लग्नायोग्य झाली तरी अजून तिचे शिक्षण सुरु होते. शिक्षण घेणारी वैष्णवी दिसायला देख़णी होती. चारचौघात तिचे रुप खुलून दिसत असे. त्यामुळे तीचे रुप पटकन कुणाच्याही नजरेत भरत असे. साध्या व सरळ स्वभावाची वैष्णवी कुणाच्या अध्यात मध्यात नव्हती.

शिक्षणासाठी जातांना देखील ती आपली खाली मान घालून जात व येत होती. यातून तिचा सरळमार्गी स्वभाव सहज लक्षात येत होता. मात्र तिचा हाच सरळमार्गी स्वभाव गावातील काही तरुणांना खटकत होता. वैश्नवीने आपल्याशी स्वत:हून बोलावे असा काहींचा हेतू रहात होता. मात्र वैष्णवी कुणाच्या नजरेला भिक घालत नव्हती.

वैष्णवी नारायण गोरे ही तरुणी आपल्या आईवडीलांसह जालना जिल्हयातील मंठा या गावात रहात होती. जालना जिल्हयातील नांदेड महामार्गावर मंठा हे गाव वसलेले  आहे. तसे बघता मंठा हे गाव म्हणजे जणू काही एक छोटे शहरच म्हणावे लागेल. वैष्णवी रहात असलेल्या जुन्या वस्तीतील अनेक रहिवाशांनी आपली जुनी घरे विकून ते नवीन वसाहतीत स्थलांतर केले होते. त्यामुळे जुन्या वस्तीत नवीन लोकांचे आगमन झाले होते. मात्र वैष्णवी आणि तिचे आई वडील जुन्याच वस्तीत रहात होते.  

वैष्णवीचे वडील नारायण गोरे हे एक सद्गृहस्थ होते. मिस्तरी काम करुन नारायण गोरे आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होते. वैष्णवी ही त्यांची लाडाची लेक होती. लाडात वाढलेल्या वैष्णवीच्या लग्नाची चिंता त्यांना दिवसरात्र सतावत होती. प्रत्येक आईबापाला आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावत असते. त्याला नारायण गोरे देखील अपवाद नव्हते.

कुणाच्या अध्यात मध्यात नसलेली वैष्णवी दिसायला देखणी होती. त्यामुळे गावातील काही उडाणटप्पू तरुण तिच्या मागावर रहात होते. ती रहात असलेल्या गल्लीत काही तरुणांचे टोळके विनाकारण बसलेले असायचे. लॉकडाऊन काळात तर रिकामटेकड्या तरुणांना मोकळे रान होते. येणा-या जाणा-या तरुणींची छेड काढणे हा काही तरुणांच्या टोळीचा उद्योग होता.

samadhan pawar addl SP

या टोळीतील शेख अल्ताफ शेख बाबू हा तरुण मुलींची छेड काढण्यात आघाडीवर असल्याचे म्हटले जात होते. त्याची वक्र नजर वैष्णवीवर पडली होती. तो कायम तिची छेड काढत असे. त्याच्या या त्रासाला वैष्णवी वैतागली होती. मात्र तिचा सरळमार्गी स्वभाव त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची परवानगी देत नव्हता. त्यामुळे ती त्याच्या फालतू कमेंटला उत्तर देखील देत नव्हती. त्यामुळे आपोआपच त्याची किंमत कमी होत असे. तिच्या याच सरळ स्वभावाचा शेख अल्ताफ यास राग येत होता. तिने आपल्याशी बोलावे या क्षणाची तो वाट अधाशासारखा वाट बघत असे.

गल्लीत राहणा-या वैष्णवीची शिक्षणासाठी जाण्याची व येण्याची  वेळ त्याला माहित झाली होती. त्यामुळे तो कायम तिच्या मागावर रहात होता. मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे चिडलेल्या अल्ताफने तिची छेड काढण्याची तिव्रता वाढवली होती. तो जाता येता तिची छेड काढतच होता. एके दिवशी तिने आपल्याला अल्ताफचा होत असलेला त्रास घरी आपल्या वडीलांच्या कानावर घातला. त्यामुळे नारायण गोरे यांनी अल्ताफ यास चांगलेच सुनावले होते.

आता लवकरात लवकर वैष्णवीचे लग्न उरकून टाकले पाहीजे या निर्णयाप्रत नारायण गोरे आले होते. मुलीच्या भोवती पतीरुपी काटेरी कुंपन घातल्यावर आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होवू असे त्यांना वाटत होते.  त्यांनी तिच्यासाठी योग्य स्थळ बघण्याचा वेग वाढवला होता. त्यात त्यांना यश देखील आले.

S.chaitanya SP

जालना येथील तरुणाचे स्थळ त्यांना योग्य वाटले. चार जवळच्या जेष्ठ नातेवाईकांच्या मदत व सहकार्याने हे स्थळ त्यांनी नक्की केले. मात्र सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत हे लग्न पार पाडण्याचे त्यांनी ठरवले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत व साक्षीने त्यांनी 26 जून ही लग्नाची तारीख निश्चित केली.

आपले लग्न जालना येथील तरुणासोबत निश्चीत झाल्याने वैष्णवी मनातून सुखावली होती. मात्र आपल्या आईवडिलांचे घर आपल्याला सोडून जावे लागेल या विचाराने ती व्यथीत देखील झाली होती. मात्र सर्वच मुलींना एके दिवशी आपल्या सासरी जावेच लागते तसे आपल्याला देखील जावेच लागेल असा विचार करत ती आपल्या मनाची समजूत घालत असे.

वैश्नवीचे लग्न ठरल्याचे समजताच तिच्यवर एकतर्फी प्रेम करणारा गल्लीतील मजनू अल्ताफ आता चिडला होता. वैष्णवी आपली होत नसेल तर ती कुणाची होणार नाही असे त्याला मनातल्या मनात वाटत होते.

ठरल्यानुसार 26 जून रोजी वैश्नवीचे लग्न देव देवतांच्या साक्षीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. नातेवाईकांनी वर वधूच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या आणि नारायण गोरे यांचा जिव भांड्यात पडला. आपल्या मुलीचा आपल्या डोळ्यासमोर विवाह सोहळा पार पडला यासाठी ते मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते.

मात्र इकडे गावातील व गल्लीतील अल्ताफच्या मनात मात्र वेगळेच कुविचार सुरु होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर वैष्णवी आपल्या सासरी रवाना झाली. त्यावेळी तिचे वडील नारायण गोरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी सुखी संसाराचा आशिर्वाद देत तिला सासरी रवाना केले.

लग्नानंतर 28 जून रोजी वैष्णवी प्रथमच माहेरी आली. ती माहेरी येण्याची अल्ताफ वाटच बघत होता. त्याच्या मनात तिला ठार करण्याचे भुत शिरले होते. वैष्णवी आपली झाली नाही तर कुणाची होवू देणार नाही असा त्याने मनाशी निर्धार केला होता.

30 जून रोजी वैष्णवी तिच्या आई व मैत्रीणीसह बाजारात साडी खरेदी करण्यासाठी गेली. माहेरी आलेल्या लेकीला साडी घेवून देण्याचे तिच्या आईचे नियोजन होते. तिघी जणी दुपारी तिन वाजेच्या सुमारास साडीच्या दुकानात गेल्या. नवविवाहीता वैष्णवी तिच्या मैत्रीणीसह साड्यांची निवड करत होते. त्यावेळी वैष्णवीच्या आईने त्यांना म्हटले की मी शिदोरीचा निरोप सांगून येते तुम्ही साड्या घेवून घरी जा.

साडीच्या दुकानातून दोघी मैत्रीणी बाहेर निघत होत्या. तेवढ्यात मागावर असलेला शेख अल्ताफ हातात चाकू घेवून तेथे हजर झाला. त्याने काही कळण्याच्या आत नवविवाहीता वैष्णवीच्या गळ्यावर सपासप चाकूचे वार करण्यास सुरुवात केली. भर बाजारात झालेल्या या खूनाच्या घटनेने एकच खळबळ माजली. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीला तसाच टाकून शेख अल्ताफ पसार झाला. एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या शेख अल्ताफने भर बाजारपेठेत वैष्णवीचा जिव घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधिक्षक समाधान पवार यांच्यासह पोलिस निरिक्षक निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली.

दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळावरुन फरार झालेल्या अल्ताफने विष प्राशन केल्याची माहिती मिळाली. तो जालना जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. वैष्णवीचे माहेर असलेल्या भागात मंठा गावी काही तरुणांकडून तरुणींचे छेडखानीचे प्रकार नेहमीचे झाले असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here