अमरावती – मेळघाटातील जंगलात आढळणा-या अजगरांना ठार करुन त्यांचे तेल काढणा-या चौघा जणांना वन विभागाच्या अधिका-यांनी खा-या येथून ताब्यात घेत अटक केली आहे. मुन्नालाल मान्सू कास्देकर (34), परसराम लंगडा कास्देकर (40), काशीराम गोमा भिलावेकर (37) व जितू छोटेलाल भिलावेकर अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.
हत्या करण्यात आलेला अजगर झाडाला टांगल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपुर्वी समाज माध्यमांमधे प्रसारीत झाला होता. त्या व्हिडीओची दखल धारणी वनविभागाने घेत चौघांना ताब्यात घेतले आहे. धारणी वनपरिक्षेत्राचे सहायक उपवन संरक्षक पवन झेप यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने कारवाई केली असून चौघांना वन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
नदीकाठी राहणारे काही गावकरी वन्य जिवांच्या तस्करीत गुंतले असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. अटकेतील चौघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसह पुढील तपास सुरु आहे.