गोंदीया (अनमोल पटले) : पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असलेल्या जागृती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातील चौघा शिक्षकांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे ( पत्रकार ) यांच्यासह सचिव रामप्रसाद तिवुडे, बोरकर सर, खोब्रागडे सर, आरिफ पठान व इतर ठेवीदारांनी केली आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रशासनातील सर्व स्तरावर देण्यात आले आहे.
जागृती सहकारी पतसंसंस्था मर्यादीत मुंडीकोटा या पतसंस्थेचा रजिस्टर क्रमांक 797/95 असा असून या संस्थेच्या संचालक मंडळावर भा.द.वि. 406, 409, 420, 34, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे अधिनियम 1999 सहकलम 3 व 4 नुसार तिरोडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संचालक मंडळात मुंडीकोटा शिक्षण प्रसारक मंडळ मुंडीकोटा संचालित सुभाष विद्यालय मुंडीकोटा या शाळेत कार्यरत असलेले चौघे शिक्षक आहेत. राजेंद्र भरतलाल राहंगडाले, राजेंद्र धनराज पटले, भोगेलाल देवचंद बोहने, सौ. करुणाबाई बाळकृष्ण रामटेके अशी त्यांची नावे आहेत. यातील भोगेलाल देवचंद बोहने यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असलेल्या चौघा शिक्षकांना या पतसंसंस्थेच्या संचालक मंडळातून निलंबीत करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रशासनातील सर्व पातळीवर देण्यात आले आहे. पोलिसात गुन्हा दाखल असतांना देखील चौघा शिक्षकांना शालेय शिक्षण संस्थेने सेवेत सामावून घेतले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही.
या शिक्षकांवर दहा दिवसात निलंबनाची कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलनाचा इशारा जागृती भ्रष्टाचार संघर्ष समीतीचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे (पत्रकार) यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. धरणे आंदोलन करतांना काही अप्रिय घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे देखील म्हटले आहे. सदर निवेदन जिल्हाधिका-यांना देतांना सचिव रामप्रसाद तिवुडे, बोरकर सर, खोब्रागडे सर, आरिफ पठान व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .