गोंदीया (अनमोल पटले) : भंडारा पोलिस दलातील डॉग स्कॉड पथकात “रॉकी” नामक प्रशिक्षीत डॉग़चे आगमन झाले असून त्याचा सराव देखील सुरु झाला आहे. भंडारा जिल्ह्यात येऊन एखादा अपराध करण्याच्या विचारात एखादा गुन्हेगार असेल तर त्याने सावध होण्याची वेळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉबरमॅन जातीचा रॉकी नामक प्रशिक्षीत डॉग भंडारा जिल्हा पोलिस दलात दाखल झाला आहे. तात्काळ गुन्हा शोध करण्याची कला व जबरदस्त वासाद्वारे शोध शक्ती आदी वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे तो गुन्हे अन्वेषणात राज्यात दुसरा आला आहे.
17 महीने वयाच्या प्रशिक्षीत रॉकीला बघून अनेकांची भंबेरी उडाल्याशिवाय रहात नाही. अद्ययावत प्रशिक्षणासह तो नुकताच भंडारा जिल्हा पोलिस दलात दाखल झाला आहे. 9 महीने भंडारा येथे प्रशिक्षण व सीआयडी पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण करुनच रॉकीचे आगमन झाले आहे. पुणे येथे झालेल्या गुन्हे अन्वेषण परीक्षेत राज्यातील 20 कुत्र्यांमध्ये रॉकीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
रॉकीचे सहा महिन्यांचे बॉम्ब व नारकोटिक्स परीक्षण सध्या सुरु आहे. रॉकी भंडारा पोलिस दलातील सहा कुत्रांपैकी अव्वल ठरला आहे. भंडारा पोलिस दलातील रॉकीसह इतर 5 गुन्हे अन्वेषण कुत्र्यांची दिनचर्या सकाळी साडे पाच वाजता सुरु होते. दिवसभरात दीड तासांचे प्रशिक्षण पूर्ण करत जिल्ह्यात घडलेल्या गुन्हाच्या शोधात जात असतो. त्यांच्या जेवणाच्या वेळा व आणि वैद्यकीय तपासणीची निश्चित वेळ ठरली असल्याने त्यांचे आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत होत आहे.
गुन्हे अन्वेषण कुत्र्यांनी शेकडो गुन्हे सिद्ध करत गुन्हेगारांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आजही भंडारा पोलिस दलातील गुन्हे अन्वेषण कुत्र्यांची दहशत गुन्हेगारांच्या गोटात बघायला मिळते. 40 ते 45 महिन्याचे कुत्र्यांचे पिल्लू ते 10 वर्षांची सेवा या दरम्यानच्या कालावधीत त्यांचे हॅंडलर प्रशिक्षकासोबत एक प्रकारे भावनिक नाते घट्ट झालेले असते. त्यामुळे 10 वर्षांच्या सेवा समाप्तीनंतरचा दिवस हँडलर प्रशिक्षकासाठी एक भावनिक दिवस असतो.