जळगाव, दि.6 (प्रतिनिधी) – पोलीस दलात काम करत असताना सतत संघर्षजन्य परिस्थितीस सामोरे जावे लागते. हा संघर्ष आधी समजून घेणे, सुसंवाद साधणे यातून संघर्ष सुटण्यास, परिस्थितीवर निर्यंत्रण आणण्यास नक्कीच मदत होते. पोलीस दलातील 30 अधिकाऱ्यांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा जैन हिल्स गांधीतीर्थ येथे दोन दिवसांची ‘संघर्ष परिवर्तन’ निवासी कार्यशाळा नुकतीच पार पडली. पोलीसांना ड्युटी बजावत असताना संघर्ष परिवर्तन कार्यशाळेचा जीवनात उपयोग होईल असेप्रातिनिधीक मत अनेकांनी व्यक्त केले. 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही कार्यशाळा पार पडली.
पोलीस दलात काम करत असताना तोच तो एकसुरीपणा पोलीस अनुभवत असतात. त्यांच्या व्यक्तीगत व कार्यालयीन कामकाजात चांगला बदल घडावा या उद्देशाने पोलीस दलाचे नाशिक परिक्षेत्रचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलीसांसाठी तीन दिवसांची कार्यशाळा घेण्याचे ठरले. त्यानुसार संघर्ष व परिवर्तन या मुख्य विषयावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. आश्विन झाला, सुधीर पाटील यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने खेळ, प्रात्यक्षिक तसेच विचारांचे आदान-प्रदान आणि व्याख्यानाच्या स्वरूपात समजावून सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप 5 ऑक्टोबरला झाला. पोलीस आणि महात्मा गांधीजींचे विचार हा विरोधाभास असला तरी शांती प्रस्थापित करण्यासाठी समाजात पोलीसाची भूमिका फारच महत्वाची ठरते. संघर्ष परिवर्तन कार्य़शाळेच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये कौशल्यात वाढ होईल व व्यक्तीगत जीवनात देखील त्याचा खूप चांगला उपयोग होईल असे ते भाषणात म्हणाले.
मुळात पोलीस म्हटले की, सामान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल पूर्वग्रहदूषीत भाव असतोच त्याचे ओझे ड्युटी करत असताना पोलींच्या मनःपटलावर कुठे ना कुठे प्रतिबिंबीत होत असते. कार्यशाळेचा उद्देश स्वतःला जाणून घेऊन आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक परंतु आनंदाने सेवा बजावण्यात या कार्यशाळेतून कौशल्य विकासीत होण्यासाठी मदत झाली. ड्युटीच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनातून दोन दिवस जैन हिल्स् परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी निवांत राहता आले. ऑ़डिओ गाईडेड खोज गांधीजीकी हे संग्रहालय बघून महात्मा गांधी समजून घेता आले याहून जीवनातला दुसरा आनंद तो कोणता… अशा भावना सहभागी प्रत्येक शिबिरार्थी पोलीस बांधवांनी व्यक्त केल्या.