कानपूर – कानपूरच्या चौबेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिकरू या गावी आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पीएम रिपोर्ट आला आहे. या पोस्टमॉर्टम अहवालात दुबेचा मृत्यू रक्तस्त्राव व धक्क्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहराच्या महाकाल मंदिरातून विकास दुबे यास अटक करण्यात आली.
दुसर्या दिवशी त्याला उज्जैन येथून कानपूरला आणले जात होते. त्यावेळी दुबे याने पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चकमकीत त्याला ठार करण्यात आले होते. पोलिसांनी दुबेला शरण जाण्यास सांगितले मात्र त्याने पोलिसांवर गोळीबार केला. क्रॉस फायरिंगमध्ये गुंड विकासचा खात्मा झाला.
या चकमकीबाबत उत्तर प्रदेश शासनाने निवृत्त न्यायमूर्ती एस. के. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहे. विरोधी पक्षाने आरोप केला आहे की, राजकीय लागेबांधे उघडकीस येण्याच्या भीतीने विकास दुबे या गुंडास बनावट चकमकीत ठार करण्यात आले. दरम्यान आयोगाला आपला अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
विकास दुबे याचा उदय आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल चौकशीकामी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांच्या अखत्यारीत केलेल्या तीन सदस्यांच्या विशेष तपास पथकाने एक ई-मेल व एक मोबाइल नंबर जाहीर केला आहे. गुंडास मारलेल्या चकमकीबाबत वास्तव तसेच त्याच्या साथीदारांविषयी काही माहित असल्यास ते सांगू शकतात.