जळगाव : सावदा येथील शेतक-याच्या दोन म्हशी चोरी झाल्याप्रकरणी सावदा पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना खामगाव येथील गुरांच्या बाजारातून अटक केली आहे. या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला गु.र.न. 166/21 भा.द.वि. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोदा बुद्रुक येथील शेतकरी किशोर सिताराम महाजन यांच्या मालकीच्या गोठ्यातील 85 हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी 14 ऑक्टोबरच्या रात्री चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी स.पो.नि. डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस उप निरीक्षक गायकवाड, हे.कॉ. विनोद पाटील, हे.कॉ. संजीव चौधरी, पोलिस नाईक रिजवान पिंजारी, पोलिस नाईक सुरेश अढायगे, मजहर पठाण व इतर स्टाफ अशांना तपासकामी रवाना करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे खामगाव येथील गुरांच्या बाजारात चोरटे चोरीच्या म्हशी विक्री करण्यासाठी येणार असल्याची कुणकुण तपास पथकाला लागताच त्यांनी खामगाव गाठले. फिर्यादी किशोर महाजन यांनी आपल्या दोन्ही म्हशी ओळखल्या. त्यानंतर सुरुवातील दोघा व नंतर इतर चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या टाटा मॅजीक वाहनासह चोरीच्या दोन्ही म्हशी हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.