जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील कृष्णा लॉनच्या मागे संशयास्पदरित्या फिरणा-या तरुणास गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. योगेश अंबादास बारी (31) रा. बारीवाडा, पिंप्राळा – जळगाव असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याच्या कब्जातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेहरुण परिसरातील कृष्णा लॉनच्या मागे एक इसम गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती पो.कॉ.छगन जनार्दन तायडे यांना समजली होती. मिळालेली गोपनीय महिती छगन तायडे यांनी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निदर्शनास आणून दिली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. योगेश बारी, मुदस्सर काझी, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. साईनाथ मुंढे, पो.कॉ. छगन तायडे, सुधीर साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांना गावठी कट्ट्यासह एक तरुण आढळला. चौकशीअंती त्याने आपले नाव योगेश अंबादास बारी असे पथकाला सांगितले. त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याला पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.
योगेश बारी यास अटक करण्यात आली. सदर गावठी कट्टा त्याने विक्रीसाठी आणला होता अशी माहिती चौकशी अंती पुढे आली. गावठी कट्टा त्याने कुठून आणला व तो कुणाला विकणार होता याची चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. अनिल गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.