जालना : जप्त करण्यात आलेली कार सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जालना तालुक्यातील सेवली पोलीस स्टेशनचे दोघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हे.कॉ.कारभारी श्रीरंग जाधव (54) व पो.कॉ. सचिन विजय कायंदे (32) अशी त्यांची नावे आहेत.
कांदे चोरी प्रकरणी तक्रारदाराची कार पोलिसांनी जप्त केली होती. ती कार परत देण्याचे न्यायालयाचे आदेश होते. त्या आदेशाची प्रत पोलिसांना देऊनही कार सोडवण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने लावलेल्या सापळ्यात दोघे पोलिस कर्मचारी एक हजार रुपयांची लाच घेतांना अडकले. अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, एस. बी. पाचोरकर तसेच पोलीस निरीक्षक एस. एस. ताटे आणि त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला.