अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत दरोडा टाकून कॉपर पट्टया चोरुन नेणा-या सराईत गुन्हेगारांना 7 लाख 29 हजार रुपयांच्या मुद्देमालासह एलसीबीने अटक केली आहे.
शिवाजी भागाजी कुदनर (41) रा . आदर्शनगर, नागापूर – अहमदनगर हे एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनीक्स या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. 22 ऑक्टोबर रोजी सोन्या बापू पळसकर व विलास परासराम नेवसे हे दोघे वाचमन ड्युटीवर होते. त्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास सहा ते सात अनोळखी दरोडेखोर त्या ठिकाणी आले. त्यांनी दोघा वाचमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरु केली. दोघांना जिवे ठार करण्याची धमकी देत आलेल्या टोळक्याने कंपनीतील 17 सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कंपनीचे लोखंडी शटर लोखंडी कटावणीने तोडून आत प्रवेश केला. कंपनीतील 17 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पट्ट्यांचे दहा बॉक्स जबरीने चोरुन नेले.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गु.र.न. 699/21 भा.द.वि. 395, 452, 324, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय अधिकारी अजित पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या समांतर तपासकामी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती.
तपासादरम्यान या गुन्ह्यातील संशयीत सिताराम कु-हाडे हा वडगाव गुप्ता येथील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पो.नि. अनिल कटके यांना समजली. या माहितीच्या आधारे स.पो.नि. गणेश इंगळे, हे.कॉ. भाऊसाहेब काळे, हे.कॉ. विजय वेठेकर, हे.कॉ. संदिप पवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, दिपक शिंदे, पोलिस कर्मचारी योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मच्छिंद्र बर्डे, कमलेश पाथरुड, आकाश काळे व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड आदींनी त्याठिकाणी जावून सापळा रचला.
सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कु-हाडे (33) मुळ रा. चितळी रेल्वे स्टेशन, चितळी, ता . राहता हल्ली रा. वडगाव गुप्ता अहमदनगर यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने या दरोड्याच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे कबुल केले. या गुन्ह्यात त्याने त्याचे साथीदार राहुल जाधव रा. प्रवारा संगम ता. नेवासा, आकाश भोकरे रा. कायगावटोक ता. गंगापुर जि. औरंगाबाद, पंकज गायकवाड रा. गोधवणी ता. श्रीरामपुर, सागर मांजरे रा. श्रीरामपुर, सतिष शिंदे रा. गणेश चौक, बोल्हेगाव, कापसे रा. कॉटेज कॉर्नर अहमदनगर, विक्की उर्फ विकास शिंदे रा. श्रीरामपुर यांची नावे उघड केली.
तपासाच्या पुढील टप्प्यात अटकेतील आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात आला. त्यात राहुल सुरेश जाधव (21) रा. पाण्याचे टाकी जवळ, प्रवारा संगम ता. नेवासा, पंकज बापु गायकवाड (27) रा. गोधवणी ता. श्रीरामपुर, आकाश रामचंद्र भोकरे (23) रा. कायगावटोक, ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांना विविध ठिकाणाहुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. इतर साथीदारांचा शोध सुरु असून ते लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ताब्यातील आरोपींच्या ताब्यातून 2 लाख 29 हजार रुपयांच्या 229 किलो वजनाच्या कॉपर पट्ट्या व गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा टेम्पो असा एकुण 7 लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटकेतील सिताराम उर्फ शितल गणेश कु-हाडे याने वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील दारुचे गोडाऊन फोडल्याची कबुली तपासादरम्यान दिली. या गुन्ह्याची नोंद वैजापूर (औरंगाबाद) पोलिस स्टेशनला करण्यात आलेली आहे. अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुध्द यापूर्वी दरोडा, चोरी, बेकायदा गावटी कट्टे बाळगणे, विनयभंग, दारु व जुगार या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे याच्या विरुध्द नाशिक उप नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, गंगापूर, सातपूर – नाशिक, नाशिकरोड, बिबेवाडी – पुणे, राहुरी, इंदीरानगर – नाशिक, लोणी इत्यादी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपींना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.