जळगाव: गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुचाकी चोरुन ग्राहकांना कमी किमतीत विकणारे प्रेमी युगल(एक पुरुष, एक महिला) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आले आहे. पुढील तपास कामी त्यांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी विक्री केलेल्या 24 दुचाकी ग्राहकांकडून व एक दुचाकी दोघा चोरट्या कडून अशा एकूण 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
भारतीय दंड संहिता – सन 1860 चे कलम 411 ” चोरीचे आहे हे माहित असुन चोरीची मालमत्ता स्वीकारणे ” नुसार याप्रकरणी ग्राहकांना आरोपी करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. जळगाव जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना पथके स्थापन करणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख,हे.कॉ.संजय सपकाळे, स.फौ.अशोक महाजन , पोहेकॉ, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील ,किरण चौधरी,महेश महाजन,पल्लवी मोरे, वैशाली पाटील,पोहेकॉ. राजु पवार, इंद्रीस पठाण तसेच स.फौ.विजय पाटील,नरेंद्र वारुळे अशांना रवाना केले होते. पथकातील सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, पोहेकॉ.संजय सपकाळे यांना गोपनिय माहिती मिळाली होती. अमळनेर शहरातील एक महिला व धरणगाव शहरातील एक पुरुष हे सोबत जळगाव जिल्हयात फिरुन मोटार सायकली चोरी करत आहेत.
सुधाकर अंभोरे यांना अशीही माहिती मिळाली की चोरलेल्या मोटार सायकली ग्राहकांना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चोरटे लिहुन देत आहेत. त्या अनुषगांने सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, पोहेकॉ.संजय सपकाळे हे सतत तीन ते चार दिवस दुचाकी चोरी करणा-या जोडीच्या मागावर होते. ते कश्या प्रकारे चोरी करतात या बाबत माहिती संकलीत करत होते.चोरी करतांना महीला पुरुषाच्या कपडयामध्ये स्वतः चोरी करायची. तीचा साथीदार मित्र हा सुमारे 10 ते 15 फुट अंतरावरुन गाडीच्या मालकावर लक्ष ठेवत असे.
चोरटी महिला ही सर्व प्रकारच्या मोटार सायकल सुसाट वेगाने चालविण्यात पारंगत आहे. पुरुषाचे कपडे परिधान केल्यामुळे तिला गाडी चालवणे सोपे जात होते. तिचा साथीदार (पुरुष आरोपी) हा तिच्या मागे बसत होता. सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी नावे निवृत्ती उर्फ छोटु सुकलाल माळी (48) रा.मोठा माळी वाडा, धरणगाव व हेमलता देविदास पाटील(34) , व्हाईट बिल्डींग, खडडाजीन समोर अमळनेर असे निष्पन्न झाले आहेत.आता पर्यंतच्या तपासात एकूण 25 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
यात बजाज प्लॅटिना – 03 , हिरो पॅशन प्रो – 10 , हिरो स्लेंडर – 04 , हिरो डिलक्स् – 05 , होंडा शाईन – 02, बजाज सीटी – 01 अश्या एकुण 25 मोटार सायकली मिळुन आल्या आहेत. सर्व 25 मोटार सायकली विकत घेणा-या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहिता – सन 1860 चे कलम 411 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
या गुन्हयात ” कोणतीही चोरीची मालमत्ता , ती चोरीची मालमत्ता आहे हे माहित असताना किंवा तसे समजण्याला कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवुन घेईल त्याला,तीन वर्षे असु शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जळगाव जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही वाहन खरेदी करतांना / व्यवहार करतांना त्या वाहनाचे मुळ कागदपत्रे पाहुन मालकाबाबत खात्री करुनच वाहन विकत घ्यावे. दोघा आरोपींना भाग-5 गुरन.34/2020 भादवि.क.379 या गुन्हयांचे तपास कामी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बघा विडियो