आरटीआय कार्यकर्त्यास केली मदत पुण्यात तिघांना अटक

काल्पनिक छायाचित्र

पुणे : बांधकाम व्यावसायिकास बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपये व जमीनीची मागणी करणे तसेच आरटीआय कार्यकर्त्याला पळून जाण्याकामी मदत केल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विशाल शिवाजी ढोरे (३६), अस्लम मंजूर पठाण (२४) दोघे रा़ मांजरी, हडपसर आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (२८) रा़ उत्कर्ष सोसायटी, कात्रज अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. 

सुधीर कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, संबंधित महिला व बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना अटक केली होती़. त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे. मात्र या गुन्ह्यातील आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे , अमोल चव्हाण फरार आहेत. कोथरुड पोलिसांच्या तपासात या तिघांनी बऱ्हाटे यांना पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे समजते. 

त्यांना नवीन सीम कार्ड खरेदी करुन दिले़. हे तिघे व बऱ्हाटे ८ जुलै रोजी लक्ष्मी कॉलनीत भेटले. तेथून त्यांनी बऱ्हाटे यांना सोलापूरला नेण्याचे काम केले. त्याठिकाणी अमोल नावाच्या व्यक्तीच्या घरात ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. बऱ्हाटे यांचा ठिकाणा या तिघांना माहित आहे. 

त्यांना पनवेल, लोणावळा आणि सोलापूर या ठिकाणी तिघांनी लपवल्याचे निष्पन्न होत आहे. त्यासाठी वापरलेली वाहनेही जप्त करायची आहेत. यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.न्यायालयाने तिघांना २९ जुलैपावेतो पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here