नंदुरबार : महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या गुजरात राज्यातील वेलदा, ता.निझर येथे जमावाकडून खाजगी दवाखान्याच्या साहित्याची भरचौकात जाळपोळ करण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या निझर पोलीस ठाण्यातील फौजदारासह जमादारावरही जमावानेही हल्ला चढविल्याने हे दोघे जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत वृत्त असे की नंदुरबार जिल्हयाच्या सीमेलगत गुजरातमधील वेलदा गाव आहे. या गावातील कुकरमुंडाफळी परिसरातील एका वृद्ध महिलेची तब्येत सोमवारी रात्री बिघडली. त्यामुळे त्या वृद्ध महिलेचे नातेवाईक रात्री एका खाजगी डॉक्टरांना घरी बोलविण्यास गेले होते. मात्र कोरोनाच्या वातावरणात डॉक्टरांनी रात्री घरी उपचार देण्यास नकार दिला. त्यामुळे वृद्ध महिलेचे नातेवाईक चिडले होते.
दरम्यान, सोमवारी रात्रीच त्या वृद्ध महिलाचा दुर्दवी मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक व परिसरातील रहिवासी चिडले. रात्रीच त्यांनी दवाखान्याच्या आवारात संताप व्यक्त केला. त्यानंतर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेकडोचा जमाव दवाखान्यावर चाल करुन आला. बंद दवाखाण्याचे कुलूप तोडून आतील फर्निचर व काचेची तोडफोड केली.
दवाखान्यातील साहित्य रस्त्यावर फेकून त्याची जाळपोळ केली. या घटनेमुळे गावातील वातावरण बिघडले.निझर पोलिसांना माहिती मिळताच फौजदार आर.एच. लोह व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जमावाने पोलिसांनी उलट पोलिसांवर हल्ला केला.
त्यात फौजदार लोह यांच्यासह जमादार जयेशभाई लिलकीया जखमी झाले. त्यांना निझर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास दोन तास हा प्रकार वेलदा गावातील रस्त्यावर सुरू होता. या प्रकरणी निझर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.