पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयात फोन करत २५ लाखांची मागणी एकाने केली होती. पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकी देखील दिली होती. याप्रकरणी एका संशयितास आज पहाटे पुण्यात अटक करण्यात आली.
निगडी पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. सौरभ संतोष अस्तूर (३१) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात एक फोन आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर गरिबांना मदत करण्यासाठी २५ लाख रुपये फोनवर मागण्यात आले होते.
त्यासाठी पर्वती येथील कार्यकर्त्याला पाठवतो, असे फोन करणा-याने फोनवर सांगितले होते. पैसे दिले नाही तर बघून घेण्याची धमकी देखील फोनवर देण्यात आली होती. या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनला १७ रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
तांत्रिक माहितीच्या आधारे येरवडा येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, आपला फोन चोरीला गेल्याचे त्याने सांगितले. फोन चोरीला गेल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मोबाइल चोराची माहिती घेण्यात आली. त्यानुसार आज पहाटे कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. निगडी पोलीस कसून चौकशी करीत आहेत.