जळगाव : कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत बंद घरातून टीव्ही चोरीला गेला होता. चोरीला गेलेल्या टीव्हीचा शोध दोन आठवड्याच्या आत एमआयडीसी पोलिसांनी लावला.जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील मंगलपुरी परिसरात काजल साळुंखे ही विवाहित महिला आपल्या परिवारासह भाड्याच्या घरात राहते. तिच्या ताब्यातील भाड्याच्या घराला कडीकोंडा नाही. बाहेर जातांना घराच्या बंद दाराला दोरी बांधून ती जात असते.
तिचा भाऊ आकाश साळुंखे याने बहिण काजल हिस एक टीव्ही भेट दिला होता. 10 जुलै रोजी काजल साळुंखे आपल्या परिवारासह बुरहानपुर या गावी एका लग्नसमारंभात गेली होती. आठ दिवसांनी सर्व परिवार घरी परत आला. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. भावाने भेट दिलेला टीव्ही गायब झालेला होता. काजल साळुंखे हिने हा प्रकार भाऊ आकाश याच्या कानावर घातला.
या प्रकरणी आकाश साळुंखे याने एमआयडिसी पोलिसात रितसर चोरीचा गुन्हा दाखल केला.पो.नि. विनायक लोकरे यांनी या गुन्हयाच्या तपासकामी आपले सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व पो.नाईक इमरान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पुढील तपास सुरु होता.
दरम्यान गुन्हे शोध पथकातील इमरान सैय्यद यांना चोरी गेलेल्या टीव्हीच्या चोरट्यांची गुप्त माहिती मिळाली. चोरी झाली त्या परिसरातील रहिवासी दगडू प्रल्हाद शिंदे व गौरव रविंद्र खरे अशा दोघांची नावे तपासात पुढे आली. दोघा चोरट्यांना नशिराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी चोरी केलेला टिव्ही त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवला होता. तो जप्त करण्यात आला तसेच दोघांना अटक देखील करण्यात आली.भाड्याचे घर असले तरी घराच्या दरवाज्याला स्वखर्चाने किमान सुस्थितीत असलेला कडी कोंडा लावणे गरजेचे आहे.