केवळ खान्देशच नव्हे तर महाराष्ट्र स्तरावरील आघाडीचे नेते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून गाजलेले लोकप्रिय नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्या कारवर शिवसैनिकांनी पिस्तुल रोखून हल्ला केल्याच्या कथित घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांचा शब्द कुणी खाली पडू देऊ शकत नाही असे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांच्या सुकन्या सौ. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांच्या कारवर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडण्यासह पिस्तुल रोखून हल्ला केल्याच्या बातमीने काही काळ खळबळ उडाली असली तरी कथित घटना अद्यापही कुणाच्या पचनी पडत नाही. मुक्ताईनगर तालुका परिसरात एकनाथराव खडसे परिवाराचे सर्वपक्षीय भक्तगण एवढे प्रचंड संख्येने आहेत की एखाद्या अवैध धंद्याच्या छुटपुट तक्रारीवरून कुणीही हल्ला करण्याची हिंमत करु शकतो ही गोष्टच कुणाच्या पचनी पडत नाही.
विशेष म्हणजे रोहिणीताई खडसे – खेवलकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठबळावर पराभूत करणारे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील कधीकाळी नाथाभाऊंचे नेतृत्व मानणारे होते. त्यांची “नाथभाक्ती” आणि त्यांचे रहस्य त्यांना प्रदीर्घ काळ आमदारपदापासून दूर ठेवून होते असे आजही बोलले जाते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीची दोन वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याचे आजवरचे भाजपचे डावपेच फेल गेले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता घालवून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्याची घोषणाबाजी हा देखील राजकीय डावपेच म्हटला जात आहे. खरे तर हे देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या पुन्हा होणा-या युतीत पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये असेच असेच दिल्लीस वाटत असावे असे बोलले जाते. सलग दोन वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची भाजपाची सत्ता आणणारे देवेंद्र फडणवीस लागलीच राष्ट्रीय राजकारणात मोठ्या पदावर एन्ट्री घेऊ शकतात या धास्तीमुळे नागपूरचे संघशिष्य नितीनजी यांच्यासह अनेकांचे धाबे दणाणले असे म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चतुर राजकारणी शरद पवार यांची मदत घेऊन भाजपाच्या फडणवीस यांना सत्तापदावरुन घालवण्याची खेळी करण्यात आली असे काही राजकीय निरीक्षकांना वाटते.
भाजपाच्या पाळीव पत्रकारांच्या मिडिया टोळीतून नेहमीच महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यात नितीन गडकरी यांना मात्र अपवाद केला जात आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दुस-यांदा निवडून येऊ नये म्हणून गडकरी यांच्या कथित बेनामी संपत्ती प्रकरणी मीडियातून मोहीम उघडण्यात आली होती. आता तर उत्तर प्रदेशातील योगीजी यांनी तेथेच मुख्यमंत्रीपदाची उबदार खुर्ची सांभाळत बसावे म्हणून ब-याच राष्ट्रीय नेत्यांचा जोरदार आटापिटा दिसून येत आहे.
उत्तर प्रदेश खालोखाल महत्वाच्या महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेसाठी आतुर झालेल्यांना आता शिवसेनेला ठोकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीची गरज भासू लागल्याचे बोलले जाते. शिवसेनेला झटका देण्यासाठीची भावी उपाय योजना म्हणून जळगाव जिल्ह्यात वजनदार राजकीय नेते नाथाभाऊ खडसे यांच्या ताकदीचा चलाखीने वापर केला जात आहे. भावी राज्य विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसच्या जागा वाढवण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात एकनाथराव खडसे यांच्याकडेच उमेदवार ठरवणे आणि निवडून आणण्याची सूत्रे दिली जाणार आहेत. त्या संभाव्य रचनेत मुक्ताईनगरातून सौ. रोहिणीताई खडसे निवडून आल्या तरच त्यांना मंत्रीपदाचा मुकुट दिला जाऊ शकतो. हे नाथाभाऊंच्या परिश्रमातून होऊ शकते. नाथाभाऊ यांनी त्यांच्या सुनेला खासदारकी बहाल केली असली तरी मुलींना मात्र अद्याप काहीही दिले नाही याची कुटुंब कबिल्यात खंत व्यक्त होत असल्याचे समजते. आतापर्यंत वाण्या ब्राम्हणांचा पक्ष वाढवण्यात जीवाचे रान करणा-या नाथाभाऊंना भाजपने कात्रजचा घाट दाखवल्याने खडसे परिवारात खासदारकीचे ओझे वाटू लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे भावी राजकारणात जनतेची सहानुभूती मिळावी यासाठी रा.कॉं., भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस नेते वाट्टेल ती नाटके करु शकतात, सोंगे वठवू शकतात असे जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यभरात बोलले जाते. हि बाजू लक्षात घेता शिवसेनेला आताच बदनाम करण्याची नेपथ्य रचना जळगावपासून तर सुरु झाली नाही ना? अशीही शंका घेतली जात आहे. रा.कॉं. च्या छुप्या पाठींब्यावर नाथाभाऊंचे (भाजपा) राजकारण संपवण्यासाठी निवडून आणलेल्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेची कवच कुंडले घेण्याचा प्रयत्न करताच त्यांनाही त्यांची जागा दाखवण्यासाठी खानदेशात “एकनाथ प्रयोग” चे नाटक तर खेळले जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता सन 2021 मधून सन 2022 मध्ये प्रवेश आपण करतोच आहोत. देखीये आगे आगे होता है क्या?