जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : सुचिता आणि शुभम हे दोघे शाळकरी मित्र होते. भुसावळ शहराच्या आरपीडी रस्त्यावरील श्री संत गाडगे महाराज हिंदी हायस्कुल मध्ये दोघांचे शिक्षण सुरु होते. शुभम अकरावीत तर सुचिता बारावीच्या वर्गात शिकत होती. शालेय शिक्षण घेत असतांना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. टीन एज अर्थात तेरा ते वीस या वयोगटातील तरुण तरुणींमध्ये एकमेकांबद्दल मोठ्या प्रमाणात शारीरिक आकर्षण असते. या वयात एखाद्या मुलीने एखाद्या मुलाकडे केवळ दृष्टीक्षेप टाकला तरी त्या मुलाच्या मनात शहारे निर्माण होतात. आपल्याकडे एखाद्या मुलीने कटाक्ष टाकत केवळ स्मित हास्य केले तरी त्या मुलाला खुप मोठेपणा वाटतो. मुलगी आपल्यावर भलतीच खुश असल्याचा भ्रम निर्माण होऊन आपण जग जिंकल्यासारखे व गड चढल्यासारखे त्या तरुणाला या वयात वाटते.
सुचिता व शुभम या जोडीचे देखील असेच काहीसे झाले होते. ज्युनियर शुभमचे सिनियर सुचीतावर प्रेम जडले होते. दोघांच्या नजरेचा गुलकंद लवकरच प्रेमाच्या फुलात रुपांतरीत होण्यास वेळ लागला नाही. या वयातील प्रेम हे प्रेम नसून केवळ आकर्षण असते याची कल्पना अनेक तरुण तरुणींना नसते. प्रेमाची परिभाषा समजण्या इतपत दोघांमध्ये परिपक्वता आलेली नसते. या वयात केवळ शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असते हे अनेक टीन एजर तरुण तरुणींना समजत नाही.
सुचिता ही ओमप्रकाश रविदास खरे यांची मुलगी होती. ओमप्रकाश खरे हे एक खासगी नोकरदार होते. भुसावळ शहरातील कवाडे नगरात राहणा-या ओमप्रकाश खरे यांच्या खांद्यावर पत्नीसह तीन कन्या व दोन पुत्र अशा सहा जणांची पर्वताएवढी प्रापंचिक जबाबदारी होती. सकाळ झाली म्हणजे जेवणाचा टिफीन सोबत घेत नोकरीनिमित्त जळगावला जाणे व रात्री भुसावळला घरी परत येणे असा त्यांचा दिनक्रम होता. साहजीकच दिवसभर जळगावला नोकरी करत असल्यामुळे आपल्या संसाराकडे पुरेपूर लक्ष देणे ओमप्रकाश यांना शक्य होत नव्हते. दरम्यान सुचिताचे शाळेतील शुभम बारसे या विद्यार्थ्यासोबत सुरु असलेले प्रेमप्रकरण चांगलेच बहरले होते. दोघांच्या प्रेमाचा सिलसिला कित्येक दिवसांपासून अव्याहतपणे सुरु होता.
बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी शुभमने डी.एल. हिंदी कॉलेज मध्ये तर सुचीताने कोटेचा महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर दोघांचे पुढील शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयात सुरु असले तरी त्यांच्या प्रेमाचा झरा झिरपतच होता. दोघांचे मोबाईलवर बोलणे व चोरुन लपून भेटण्याचा सिलसिला जारी होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची जराही कुणकुण त्यांच्या घरी अद्याप लागलेली नव्हती. गुमसुम आणि सामसूम जागी दोघांचे प्रेमचाळे चोरी चोरी चुपके चुपके सुरु होते.
सन 2017 मधील उन्हाळ्याचे ते दिवस होते. महाविद्यालयीन परीक्षा आटोपल्या होत्या. दोघांकडे भरपूर रिकामा वेळ उपलब्ध होता. दोघांनी छु मंतर – कालीमंतर म्हणत एकमेकांच्या हातात हात गळ्यात गळे टाकून दीपनगर गाठले. दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील एका मंदिरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकून देवाला साक्षी ठेवत गुपचूप लग्न केले. चोरुन लपून लग्न केल्यानंतर दोघे आपापल्या आईवडिलांकडे जणू काही झालेच नाही अशा पद्धतीने रहात होते. मात्र संधी आणि रिकामी जागा मिळताच वेळ न दवडता दोघे प्रेमी मिलनासाठी सरसावत होते. मौका बघून मिलनाचा चौका मारण्यात दोघे आघाडीवर होते. शरीर संबंध निर्माण करत असल्याची कुणकुण त्यांनी कुणाला लागू दिली नाही. मात्र एके दिवशी दोघांच्या प्रेमसंबंधाची भनक सुचिताच्या वडिलांना लागली. शैक्षणिक कालावधीत आपल्या मुलीचे पाऊल वाकड्या दिशेने पडू नये असा विचार करत त्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. आपल्यासाठी स्थळ शोधण्याची मोहीम शीघ्रगतीने आपल्या पालकांनी सुरु केली असल्याची माहिती सुचीताने शुभमला दिली.
जुलै 2017 मध्ये सुचीताचे लग्न मध्य प्रदेशातील एका तरुणासोबत लावून देण्यात आले. लग्न झाल्याने साहजिकच तिला तिच्या सासरी पतीच्या घरी जावे लागले. लग्नानंतर पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी भूसावळ येथे आली. प्रसूत झालेल्या सुचीताला पुत्ररत्न लाभला. माहेरी आल्यानंतर ती आपले पहिले प्रेम विसरु शकली नाही. शुभम देखील तिला विसरला नव्हता. माहेरी आल्यानंतर पुन्हा दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. आपण मंदिरात एकमेकांना वरमाला घालून लग्न केले आहे, आपण दोघे पती पत्नी आहोत असे शुभमने तिला म्हटले. तू सासरी जावू नकोस असे देखील त्याने पुढे बोलतांना तिला म्हटले. त्याचा अट्टाहास व शारीरिक प्रेम यांची सांगड बसली. ती सासरी गेली नाही. मात्र विवाहित मुलीने जास्त दिवस माहेरी राहू नये, सासर हेच तिचे सर्वस्व असते अशी समजून घालत तिच्या वडिलांनी तिला सासरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र शुभमच्या आहारी गेलेली सुचिता सासरी जाण्याचे नावच घेत नव्हती. मात्र तिचे वडील ओमप्रकाश हे तिला सासरी जाण्याची सक्ती करत होते.
माहेरी आलेल्या सुचीताचे शुभमसोबत संधी साधून चोरुन लपून शरीर संबंध सुरु होते. त्यातून कालांतराने निसर्गाने आपले काम चोखपणे बजावले. शुभमसोबत रात्र घालवता घालवता त्याच्यापासून दिवस कधी गेले हे तिला समजलेच नाही. आपल्या पोटात शुभमचा गर्भ वाढत असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने हा प्रकार त्याच्यासह आई वडिलांजवळ कथन केला. या प्रकारातून आपली बदनामी होत असल्याचे सुचीताच्या पालकांच्या लक्षात आले. तिने तात्काळ सासरी जावे यासाठी तिच्यावर सक्ती केली जात होती. मात्र ती सासरी जात नव्हती. कालांतराने ती पुन्हा प्रसूत झाली. तिला शुभमपासून देखील पुत्रप्राप्ती झाली.
कलेकलेने तिची मुले मोठी होऊ लागली. साधारण सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर सुचीताच्या वडिलांच्या रागाची तीव्रता कमी झाल्याचा अंदाज शुभमने घेतला. आमचा अगोदरच प्रेम विवाह झाला असून आता माझ्यापासून तिला मुलगा देखील झाला आहे. तो मुलगा मोठा देखील झाला आहे असे सांगत शुभमने सुचीताच्या वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात कमी अधिक प्रमाणात ओमप्रकाश खरे यांच्या रागाची तीव्रता कमी झाली होती. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी सुचीताला शुभमसोबत त्याच्या आईवडिलांकडे जाण्यास परवानगी दिली.
त्यानंतर काही महिने असेच निघून गेले. दिवसामागून दिवस जात होते. सुचिता व शुभम यांच्यात कमी अधिक प्रमाणात घरगुती वाद सुरु होते. मात्र काही दिवसांनी शुभमला सुचीताच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. तिला तिच्या वडिलांनी संपर्कासाठी मोबाईल घेऊन दिला. त्या मोबाईलवर ती कुणासोबत तरी खूप वेळ बोलत असल्याचा शुभमला संशय येत होता. शुभमच्या म्हणण्यानुसार ती केव्हाही तिच्या आई वडिलांकडे तर कधी तिच्या मित्रांना भेटण्यास निघून जात होती. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. तिचे कुणाशीतरी गैरसंबंध असल्याचा शुभम यास दाट संशय येत होता. या कारणावरुन व संशयावरुन दोघात वाद होण्यास सुरुवात झाली होती. या वादाला वैतागून तिने महिला दक्षता समितीकडे त्याची तक्रार केली होती. महिला दक्षता समितीच्या माध्यमातून दोघात समझौता झाला. मात्र काही दिवसांनी पुन्हा दोघात वाद सुरु झाले. ती संतापाच्या भरात तिच्या माहेरी निघून गेली व एका खासगी दवाखान्यात नोकरी करु लागली.
ती मोबाईलवर कुणाशीतरी बोलत असते तसेच ती कुणाच्या तरी नादी लागली असल्याची शुभम यास शंका येत होती. तिचे वर्तन बिघडले असल्याचे शुभमचे म्हणणे होते. ती मुलाला सांभाळण्यास तयार नव्हती. ती एकटी राहण्यासाठी शुभमकडे तगादा लावत होती. एकंदरीत तिच्या वागण्यात व बोलण्यात बदल झाल्याचे शुभमच्या लक्षात येत होते. मुलगा लहान असल्यामुळे त्याला तुझी गरज असल्याचे शुभम तिला समजावत होता. मात्र ती मुलाला सांभाळण्यास तयार होत नव्हती. तिच्या अशा वागण्यासह अटी शर्थीमुळे शुभम त्रस्त झाला होता.
28 डिसेंबर रोजी सकाळी सकाळी सुचीताने तिच्या वडिलांच्या घरुन शुभमला फोन केला. आता मला माझ्या वडिलांकडे देखील रहायचे नाही. मला स्वतंत्र रहायचे आहे अशा पद्धतीने ती शुभमला बोलू लागली. मला पैसे हवेत अशी तिने मागणी सुरु केली. मी मुलाला सांभाळणार नसून त्याला घेऊन जा असे ती शुभमला सांगू लागली. अशा प्रकारे तिने दिवसभर शुभमला त्रस्त करुन सोडले. मुलाला घेऊन जा नाहीतर मी त्याला रस्त्यावर सोडून देते अशा शब्दात ती बोलू लागल्याने शुभम अजूनच वैतागला.
अखेर त्याने सुचीताच्या एका मैत्रिणीकडे मुलाला घेऊन येण्यास तिला सांगितले. तेथे तिच्याकडून त्याने मुलाला आपल्या ताब्यात घेतले. मुलाला सोबत घेत त्याने आपले घर गाठले. मात्र तो मुलगा सारखा रडत होता. त्याला आई सुचीताची आठवण येत होती. मात्र ती मुलाचा सांभाळ करण्यास तयार नव्हती. इकडे मुलगा रडून रडून त्याला हैराण करत होता. काही तास त्याने मुलाचा सांभाळ केला. मात्र तो देखील मुलामुळे हैराण झाला. अखेर वैतागून त्याने सुचीताला फोन केला. त्याने तिला सांगितले की मुलगा मला खूप त्रास देत असून त्याला घेऊन जा. त्यावर तिने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. तिने त्याला म्हटले की मी मुलाला सांभाळणार नाही. मला स्वतंत्र जगायचे आहे. तू मुलाला माझ्याकडे आणले तर मी त्याला कुठेही सोडून देईन. आता सुचीताला धडा शिकवला पाहिजे असे शुभमने मनाशी म्हटले.
मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे असे सांगत त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फिश मार्केटनजीक डॉ. फिरोज यांच्या दवाखान्याजवळ त्याने तिला रात्रीच्या वेळी येण्यास सांगितले. आता तिचा हिशेब चुकता करायचा असे मनाशी म्हणत त्याने घरातून चाकू घेतला. उजव्या पायाजवळ त्याने तो चाकू लपवला. एका मित्राला त्याने संत गाडगे महाराज हायस्कुलजवळ बोलावून घेतले. माझ्या मोबाईलवर सारखे सारखे कॉल येत असून हा मोबाईल मी परत येईपर्यंत तुझ्याजवळ ठेव असे त्याला बजावले. तू येथेच थांब असे सांगत शुभम तेथून सुचीताला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी रात्रीचे साधारण नऊ – सव्वा नऊ वाजले होते. ठरल्याप्रमाणे तेथे सुचिता आली.
त्याने तिला समजावण्यास सुरुवात केली की तुझा मुलगा अजून खूप लहान आहे. तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मात्र ती त्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मला दुसरे लग्न करायचे आहे. मला तुझ्यासोबत रहायचे नाही असा हेका तिने सुरु केला. ती ऐकत नसल्याचे बघून त्याने तिला अंधारात काटेरी झुडूपात ओढून नेले. काटेरी झुडूपात निर्जन स्थळी त्याने मागच्या बाजूने तिचे तोंड दाबले. दुस-या हाताने पायाजवळ लपवलेला चाकू बाहेर काढला. त्या चाकूने त्याने तिच्या पोटावर, छातीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. जीवाच्या आकांताने तिने तेथून पळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तिचा प्रयत्न तोकडा ठरला. ती जमिनीवर कोसळली. तिच्याच ओढणीने त्याने तिचे तोंड दाबून ठेवत चाकूचे सपासप वार सुरुच ठेवले. सर्व राग त्याने तिच्यावर काढण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. तिला मारत असतांना त्याच्या हातातील चाकू तुटला. दरम्यानच्या कालावधीत सुचीताची हालचाल मंदावली होती. तिचा श्वास सुरु असल्याचे बघून त्याने तिच्याच ओढणीने तिला गळफास दिला. ती मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर शुभम तेथून पसार झाला.
दुस-या दिवशी 29 डिसेंबरच्या सकाळी रक्ताच्या थारोळ्यात सुचीताचा मृतदेह परिसरातील लोकांच्या नजरेस पडला. भयावह अवस्थेतील मृतदेह बघून काही सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती भुसावळ शहर पोलीस स्टेशनला कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भुसावळच्या दिशेने धाव घेतली. त्यापाठोपाठ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, विनोदकुमार गोसावी यांच्यासह सहायक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, मोहन पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली कोलते, सोपान पाटील, जाकीर मन्सुरी, विकास बाविस्कर आदी कर्मचारी वर्गासह फॉरेन्सिक लँबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित जमावातील काही जणांनी मयत तरुणीला ओळखले. सुरुवातीला सर्वांसाठी अनोळखी असलेल्या सुचिताची ओळख पटल्यामुळे पोलिसांसाठी पुढील तपासाचा मार्ग मोकळा झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुचीताचा चपला पडल्या होत्या. ओढणी जवळच पडलेली होती. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा आदी कायदेशीर सोपास्कर आटोपण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह नगरपालिकेच्या दवाखान्यात उत्तरीय तपासणीकामी रवाना करण्यात आला. सुचीताच्या अंगावर चाकूचे तब्बल दहा वार करण्यात आले होते. दरम्यान या घटनेची माहिती मयत सुचीताच्या घरी समजली. हा प्रकार जळगाव येथे नोकरीच्या ठिकाणी गेलेल्या तिच्या वडिलांना समजताच त्यांनी भुसावळ गाठले.
मयत सुचीताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलीस स्टेशनला संशयित शुभम चंदन बारसे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 220/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. संशयित शुभम बारसे हा बेपत्ता असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच गडद झाला. मात्र पोलीस कर्मचारी सोपान पाटील यांनी आपले नेटवर्क वापरुन त्याला काही तासातच शोधून काढले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला.