ट्रक चालकास लुटणारे एलसीबीने केले जेरबंद

जळगाव : मालवाहतुकीचे पैसे घेऊन परत जाणा-या ट्रक चालक व क्लीनर यांना लुटणा-या पाच लुटारुंना एलसीबी पथकाने निष्पन्न करत अटक केली आहे. त्यांना पुढील तपासकामी पहूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

30 डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळ परतुर येथून जळगावच्या दिशेने रिकामी ट्रक (एमएच 19/सीवाय 6386) येत होती. त्यावेळी दोन मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपीतांनी तो ट्रक अडवत त्यातील चालक व क्लिनर या दोघांना त्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले दोन्ही मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते. पोउनि. अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजित अशोक जाधव, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींनी तपासाला सुरुवात केली होती. या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांनी आयशर या रिकाम्या ट्रकलाच अडवून लुट का केली याचा अभ्यास केला. तपासाअंती त्यांच्या असे लक्षात आले की भाग्यश्री पालीमर्स, उमाळा या कंपनीच्या ट्रकचालकांकडे माल रिकामा केल्यानंतर त्यांच्याकडे मोठया प्रमाणात मालाचे रोख पैसे असतात. त्यामुळे या रिकाम्या ट्रकला त्यांनी आपले टार्गेट केले असावे अशी पोलीस तपास पथकाला शंका आली. त्या दृष्टीने तपास करण्यात आला.

तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लुटलेल्या रिकाम्या ट्रकच्या कंपनीस भेट देवून तेथे काम करणा-या कामगारांची माहिती घेतली. तोंडापुर व वाकोद परिसरातील ट्रक चालकांची गोपनिय माहिती काढण्यात आली. त्यानुसार काही संशयीत इसमांचे फोटो प्राप्त करण्यात आले. ते फोटो फिर्यादीस दाखवले असता त्यातील एका इसमास फिर्यादीने ओळखले. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी खबरी नेमून त्यांना फिर्यादीने ओळखलेल्या अज्ञात आरोपीचा फोटो दाखवत पुढील तपासाला सुरुवात केली. फिर्यादीने ओळखलेला इसम व त्याचे साथीदार असे गोद्री ता.जामनेर गावावरुन फत्तेपुरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पो. नि. किरणकुमार बकाले यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी वर्गाला तात्काळ फत्तेपुरच्या दिशेने रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फत्तेपुर येथे सापळा रचत संशयीतासह एकूण पाच साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांनी गुन्हयांत हिसकावून चोरी केलेले सोळा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल काढून दिले. गुन्हयात वापरलेल्या हिरो फॅशन व बजाज पल्सर या दोन मोटार सायककल तपासकामी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here