गुंगीचे औषध देत तरुणीचे हैदराबादला अपहरण

जळगाव : गुंगीचे औषध देत तरुणीचे जळगावहून थेट हैद्राबाद येथे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न अपहरणकर्त्या तरुणाकडून करण्यात आला. तरुणीच्या तक्रारीनंतर सदर तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील सुप्रीम कॉलनी भागात पिडीत तरुणी नातेवाईकांसह राहते. तिच्या भावाकडे पूर्वी कार होती. त्या कारचा चालक म्हणून मोहंमद आरिफ हा काम बघत होता. मोहंमद आरिफ हा मुळचा सिकंदराबाद तेलंगणा येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने आरीफचे पिडीत तरुणीच्या भावाकडे येणे जाणे होते. त्यातून कारचालक आरिफ व पिडीत तरुणीची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

13 सप्टेबर 2021 रोजी ती घरात एकटी असतांना सायंकाळी आरिफ तिच्याकडे आला. बोलण्याच्या ओघात त्याने तिला पिण्यास शीतपेय दिले. शीतपेय घेतल्यानंतर तरुणीला गुंगी आली व ती बेशुद्ध झाली. भान हरपलेल्या अवस्थेत त्याने तीला कारने थेट हैद्राबाद येथे नेले. शुद्धीवर आल्यानंतर तिने त्याला विचारले की तू मला याठिकाणी का आणले. त्यावर तो तिला म्हणाला की मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. तू बेशुद्ध असतांना मी तुझ्या हाताचे अंगठे कागदपत्रांवर घेतले असल्याचे तो तिला म्हणाला. बेशुद्धावस्थेत मी तुझ्यासोबत काय केले आहे हे तुला माहिती नाही असे तो म्हणाला. त्यामुळे घाबरून तिने त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला. त्याला विश्वासात घेत तिने तेथील पत्ता विचारुन आपल्या भावांना त्याठिकाणी बोलावून घेतले.

भाऊ आणि नातेवाईक त्याठिकाणी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांच्याजवळ कथन केला. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांना जळगाव येथे आणले. तिच्या नातेवाईकांनी तिचे लग्न ठरवले. मात्र तिच्या ठरलेल्या लग्नात त्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तिचे जमलेले लग्न मोडण्याचा व तिची बदनामी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. त्यामुळे पिडीतेने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख व सहायक फौजदार अतुल वंजारी तसेच संजय धनगर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here