जळगाव : चारचाकी वाहनात लिफ्ट दिल्यानंतर वाटेत सीआरपीएफ जवानाची लुटमार करणा-या चौघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. श्रीकांत शांताराम माळी (रा. सावित्री नगर पारोळा) असे फिर्यादी जवानाचे नाव आहे. मनोज रमेश पगारे, आकाश राजेंद्र जगताप, प्रशांत अशोक वाघ, विशाल राजेश मोरे सर्व रा. मालेगाव जिल्हा नाशीक अशी लुटमार करणा-यांची नावे आहेत.
श्रीकांत शांताराम महाजन (रा. सावित्री नगर पारोळा) हे एरंडोल ते पारोळा जाण्यासाठी रस्त्यात उभे होते. त्यांना तवेरा गाडीतील चौघांनी लिफ्ट देत बसवून घेतले. मात्र एरंडोल गावाच्या पुढे भालगाव फाट्याजवळ चौघांनी मिळून जवान असलेले श्रीकांत माळी यांच्याकडील साडे तीन हजार रुपये व मोबाईल असा एकूण सहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. अशरफ शेख, पोलीस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, चालक अशोक पाटील, यांनी चौघा आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेत अटक केली. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासकामी त्यांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.