जालना : अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झालेल्या अज्ञात व्यक्तीचा चेहरा एका बेपत्ता व्यक्तीच्या चेह-यासोबत मिळता जुळता निघाला. मयत व्यक्ती हीच बेपत्ता व्यक्ती असल्याचे समजून बेपत्ताच्या नातेवाईकांनी त्याचा अंत्यविधी उरकून टाकला. मात्र काही दिवसांनी बेपत्ता व्यक्ती साक्षात प्रकट झाली. आपण अंत्यविधी कुणाचा केला व शोक कुणासाठी व्यक्त करत होतो या सर्वच प्रश्नांनी नातेवाईकांची पाचावर धारण बसली आहे.
जालना शहरात रेल्वे मालधक्का भागात काही दिवसांपूर्वी एका अज्ञाताचे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत निधन झाले. त्या अज्ञात मयताचे फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले. दरम्यान अडीच महिन्याच्या कालावधीत सुभाष प्रभाकर जाधव ही व्यक्ती बेपत्ता झाली होती. बेपत्ता सुभाष जाधव याचे वर्णन अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या चेह-यासोबत मिळते जुळते होते. त्यामुळे अपघाती मयत झालेली व्यक्ती बेपत्ता सुभाष जाधव हाच असल्याचा समज नातेवाईकांनी केला. ओळख पटवून नातेवाईकांनी तो मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेत त्याचा अंत्यविधी देखील आटोपला. मात्र काही दिवसांनी खरा बेपत्ता सुभाष जाधव साक्षात प्रकट झाला आणि सर्वांचीच भंबेरी उडाली. जर खरा सुभाष जाधव जिवंत आहे तर ज्याच्यावर आपण अंत्यसंस्कार केले तो कोण होता? हा प्रश्न अनुत्तरीत ठरला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.