धनलोभी सासरचा दोन लाखासाठी सुरु होता हट्ट!– गळफास घेत प्राजक्ताने मृत्यूला मिठी मारली घट्ट!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): कष्टकरी कुटुंबातील मालती बारी यांचा विवाह शेंदुर्णी येथील नंदलाल बारी यांच्यासमवेत सुमारे पंचवीस वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर मालती व नंदलाल बारी यांच्या संसार वेलीवर एका कन्यारत्नाचे आगमन झाले. त्या कन्यारत्नाचे नाव “प्राजक्ता” असे ठेवण्यात आले. मुलगी जन्माला आल्याने मालती व नंदलाल बारी या दाम्पत्याच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मात्र कन्येचे लाड करण्याचे सुख नंदलाल बारी यांच्यासाठी अतिशय अल्पजीवी ठरले. काही महिन्यांनी त्यांचे निधन झाले. पतीच्या अकाली निधनामुळे मालती बारी यांना विधवा होण्याची वेळ आली. प्राजक्ताचे पितृछत्र तर तिची आई मालती यांचे पतीरुपी छत्र हरपले होते. नियतीने दोघा मायलेकींचे छत्र हिरावून घेतले होते. प्राजक्ता अजून बालिका होती. तिला या जगाची साधी तोंडओळख देखील नव्हती. ती लहान असतांनाच पितृछत्र हरपल्याने तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तिची आई मालती बारी यांच्यावर आली होती. मोलमजुरी करुन मालती बारी यांनी प्राजक्ताच्या पालनपोषणाची जबाबदारी खांद्यावर घेतली. तिला लहानाची मोठी केली. तिचे शिक्षण पूर्ण केले.

प्राजक्ता आता लग्नायोग्य झाली होती. जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने मालती बारी यांनी मुलगी प्राजक्तासाठी वर संशोधन सुरु केले. लवकरच या श्रमाला फळ आले. जळगाव नजीक असलेल्या शिरसोली या गावातील अजय अशोक बुंधे या तरुणाचे स्थळ सर्वांना योग्य वाटले. दोन्ही पक्षातील नातेवाईकांच्या तसेच उपवर आणि उपवधू यांच्या संमतीने अजय आणि प्राजक्ता यांचा विवाह निश्चित करण्यात आला. 22 फेब्रुवारी 2021 या तारखेला दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. लग्नात मालती बारी यांनी जावई अजय यास 5 ग्रँम  वजनाची सोन्याची अंगठी, दीड तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची चेन असा ऐवज दिला होता.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्राजक्तासाठी गुण्यागोविंदात गेले. मात्र सासरची मंडळी धनलोभी असल्याचे प्राजक्ताच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. सासरकडील मंडळीचे तिला टोचून बोलण्याचा रोख तिच्या लक्षात येत होता. त्यांना केवळ तिच्या माध्यमातून तिच्या माहेरुन पैसे हवे होते हे तिला समजून चुकले होते. अजयची आजी रुपाबाई दौलत नागपुरे ही शेंदुर्णी येथे रहात होती. त्या आजीचे मार्च 2021 दरम्यान निधन झाले. त्यामुळे प्राजक्ताला तिच्या माहेरी शेंदुर्णी येथे जाण्याचा योग आला. माहेरी शेंदुर्णी येथे आल्यावर तिने आईला आपली व्यथा कथन केली. माझे पती, सासू, सासरे, जेठ व नणंद असे असे सर्व आपल्याला कसे टोचून बोलतात हे तिने आईला सांगितले. लग्नात आपल्याला मानपान व हुंडा व्यवस्थित मिळाला नाही. मनासारखे लग्न झाले नाही या कारणावरुन प्राजक्ताला नेहमी बोलणे ऐकावे लागत होते. ती व्यथा तिने आईजवळ कथन केली. मात्र आईने तिची समजूत काढली. थोडे दिवस थांब, तुला मुलबाळ झाले म्हणजे सर्व काही नॉर्मल होईल अशी समजूत घालून तिच्या आईने तिला शांत केले.

प्राजक्ता माहेरी आल्यावर तिला सासरी घेवून जाण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे मालती बारी यांनी जावई अजय बारी यांना फोन करुन बोलावले. मात्र आपण नोकरीसाठी हैद्राबाद येथे जात असून प्राजक्ताला माहेरीच राहू द्या असा त्यांना निरोप मिळाला. त्यामुळे जवळपास दोन महिने प्राजक्ता आईकडेच राहिली. त्यानंतर जून 2021 मध्ये प्राजक्ताचे सासरे तिला घेण्यासाठी शेंदुर्णी येथे आले. सासरे अशोक दगडू बुंधे यांच्यासोबत ती सासरी गेली.

जुलै 2021 मध्ये प्राजक्ता तिचा पती, सासू व सासरे यांच्यासोबत हैद्राबाद येथे गेली. हैद्राबाद येथे अजय रुग्णवाहिका चालक म्हणून नोकरी करत होता. हैद्राबाद येथे देखील प्राजक्ताच्या मागे सासरच्या मंडळींचा जाच सुटला नाही. तिने माहेरुन पैसे आणावे या त्यांच्या मागणीने ती हैराण झाली होती. आम्हाला सहा लाख रुपये हुंडा देणा-या ब-याच मुली मिळत होत्या. आम्हाला लग्नात हुंडा कमी मिळाला. आता आम्हाला अजून दोन लाख रुपये हवेत असे तिला बोलणे ऐकण्याची वेळ आली होती.

सुरुवातीच्या काळात बुंधे परिवार शिरसोली येथे पाने विकण्याचा व्यवसाय करत होता. या व्यवसायात ते कुणाचीही उधारी ठेवत नव्हते. सर्व व्यवहार ते रोखीने अर्थात रोकडा करत होते. त्यामुळे अनेक जण त्यांना रोकडे असे म्हणत होते. सुरुवातीपासून बुंधे परिवार धनलोभी असल्याचे प्राजक्ताच्या लक्षात आले होते. दोन लाख आणून द्या असा तगादा त्यांनी प्राजक्ता व तिच्या आईकडे सुरु ठेवला होता. मी एवढी मोठी रक्कम कुठून आणू? माझी परिस्थिती नाही अशी विनवणी प्राजक्ताची आई तिच्या सासरी करत होती. मात्र धनलोभी बुंधे परिवाराला त्याचे काही घेणेदेणे नव्हते. त्यांना केवळ पैसे दिसत होते.

ऑगस्ट 2021 मध्ये अजय बुंधे याने हैद्राबाद येथील नोकरी सोडून दिली. त्यामुळे प्राजक्ताला घेऊन तिचा पती अजय व सासू सासरे असे सर्व जण पुन्हा शिरसोली येथे राहण्यास आले. त्यानंतर पोळा सण आला. या सणाला माहेरी आलेल्या प्राजक्ताने हैद्राबाद येथे मुक्कामी असतांना झालेला जाच आईजवळ कथन केला. आपल्या सासरची मंडळी आपल्याला पैशांची मागणी करुन कसे हैराण करुन सोडतात याचा पाढा तिने आईजवळ वाचून दाखवला. माहेरी पाठवल्यानंतर कुणी तिला घेण्यासाठी येत नव्हते. त्यामुळे मालती बारी यांनी त्यांचा मावस भाऊ पुंडलीक सुकलाल बारी यांच्या सोबत प्राजक्ताला तिच्या सासरी रवाना केले. त्यावेळी अपशब्द बोलून दोघांना परत पाठवून दिले.

त्यानंतर 28 डिसेंबर 2021 रोजी प्राजक्ताचा पती, सासु, सासरे, मोठा जेठ असे सर्वजण तिच्या माहेरी आले. आता आम्ही प्राजक्ताला त्रास देणार नाही. तिला चांगली वागणूक देऊ असे आश्वासन त्यांनी मालती बारी यांना दिले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मालती बारी यांनी मुलगी प्राजक्ता हिस सासरी रवाना केले. त्यानंतर प्राजक्ताचा तिच्या आईसोबत संपर्क तुटला. सासरच्या धनलोभीपणाला वैतागून प्राजक्ताने आपले जीवन कायमचे संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. 19 जानेवारी 2022 रोजी एकटी असतांना तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली व या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिच्या लग्नाला वर्ष देखील पूर्ण झाले नसतांना तिने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र प्राजक्ताची तब्येत बरी नसल्याचा निरोप तिच्या आईला मिळाला. प्राजक्ताने गळफास घेत आपले जीवन संपवल्याचे मालती बारी यांना माहिती नव्हते. मालती बारी यांना मानसिक धक्का बसू नये म्हणून त्याच्या बहिणीच्या सुनबाईने त्यांना प्राजक्ताची तब्येत बघण्याच्या बहाण्याने शिरसोली येथे आणले. शिरसोली येथे आल्यावर मालती बारी यांना वेगळेच चित्र दिसून आले. प्राजक्ता मयत झालेली होती. तिला जमिनीवर ठेवलेले होते. तिच्या गळ्यावर गोलाकार व्रण दिसून आला.

मालती बारी यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळींविरुद्ध प्राजक्तास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. भाग 5 गु.र.न. 461/2022 भा.द.वि. 304 (ब), 498 (अ), 34 नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अजय अशोक बुंधे (पती), अशोक दगडू बुंधे (सासरा), शोभाबाई अशोक बुंधे (सासु), विजय ऊर्फ सोनु अशोक बुंधे (जेठ), वैशाली अशोक काळे (नणंद ) सर्व रा. शिरसोली प्र.न. ता.जि, जळगाव आदींचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली. अटकेतील पाच जणांपैकी सासू, जेठ व नणंद या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश न्यायालयाने दिले. पती व सासरा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक अमोल मोरे, रतीलाल पवार,योगेश बारी, किशोर पाटील, यशोधन ढवळे, रविंद्र चौधरी आदी करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here