कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेत विविध कार्यक्रमांवर पन्नास टक्के उपस्थितीची अट घालण्यात आली होती. मात्र लोकनाट्य तमाशांना पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यामुळे तमाशा कलावंतांमधे नाराजीचा सुर होता. मात्र या कार्यक्रमांना आता 1 फेब्रुवारी पासून परवानगी देण्यात आली आहे. तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर येत्या 1 फेब्रुवारीपासून लोकनाट्य तमाशा आणि तत्सम कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटांमधे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर तमाशा सुरु होण्याची चिन्हे दिसत असतांना पुन्हा कोरोनाच्या तिस-या लाटेने कमी अधिक प्रमाणात आगमन केले. त्यामुळे पुन्हा तमाशावर बंदी घालण्यात आली. अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, मोहित नारायणगावकर, मुसाभाई इनामदार, अविष्कार मुळे आदींनी राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत चर्चा केली. ना. अजित पवार यांनी 1 फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी दिली असून याबाबत अध्यादेश जाहीर केला जाणार आहे. वेल्फेअर फंडातून 1कोटी रुपयांची मदत देखील पवार यांनी जाहीर केली आहे. तिन हजार तमाशा कलावंतांच्या बॅंक खात्यात मदतनिधी जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.