जळगाव : जामनेर पोलिस स्टेशनच्या नुतन वास्तूचे उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. कित्येक दिवसांपासून जामनेर पोलिस स्टेशनची नुतन वास्तू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र प्रजासत्ताक दिनी या वास्तूच्या उद्घाटनाचा मुहुर्त साधला जात आहे.
ब्रिटीशकाळापासून अस्तित्वात असलेल्या वास्तूत जामनेर पोलिस स्टेशनचा कारभार अनेक वर्षापासून सुरु होता. त्याच जागेवर पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यानच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात या पोलिस स्टेशनचा कारभार वाकी रस्त्यावरील शासकीय जागेत सुरु आहे. लवकरच नवीन इमारतीमधून कारभार सुरु होणार आहे.
उद्या होत असलेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांसह स्थानिक आमदार गिरिश महाजन, स्थानिक पदाधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक (चाळीसगाव) रमेश चोपडे, पोलिस उप अधिक्षक भारत काकडे (पाचोरा उप विभाग), पोलिस निरिक्षक (जामनेर) किरण शिंदे तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून अतिशय कमीतकमी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचे नियोजन असल्याचे पोलिस उप अधिक्षक भारत काकडे यांनी “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना सांगितले. लवकरच काही दिवसात नव्या वास्तूमधून पोलिस स्टेशनचा कारभार सुरु होणार असल्याचे देखील डीवायएसपी भारत काकडे यांनी बोलतांना सांगितले आहे.