जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मंगलाबाई विलास पाटील ही चहाचे दुकान चालवत होती. तिच्या दुकानावर चहा पिण्यासाठी विविध प्रकारचे ग्राहक येत होते. तिच्या दुकानाजवळच एक साडीचे दुकान होते. त्या साडी विक्रेत्याकडे प्रमोद जयदेव शिंपी हा कामाला होता. चहा पिण्यासाठी प्रमोदचे मंगलाबाईकडे नेहमी येणे जाणे होते. तिच्या चहापेक्षा त्याला ती आवडत होती. बघता बघता दोघांचे प्रेम जुळण्यास वेळ लागला नाही. दोघांचे एकमेकांवर प्रेम बसले. बघता बघता दोघांनी प्रेमप्रकरणात लवकरच मोठी हद्द पार केली. दोघांचे प्रेम अनैतीक संबंधात बदलण्यास वेळ लागला नाही. वास्तविक मंगलाबाई एक विवाहीता होती. तिला प्रशांत नावाचा एकुलता एक मुलगा तसेच एक मुलगी असे दोन अपत्य होते. पती व दोन मुलांचा सुखी संसार सुरु असतांना ती प्रमोदच्या नादी लागली आणि वाहवत गेली.
एरंडोल तालुक्यातील विखरण येथे येथे प्रमोद शिंपी रहात होता. तेथेच त्याची शेती होती. मंगलाबाई आपल्या पती व मुलासह जळगावच्या सावखेडा शिवारातील जलाराम नगरात रहात होती. प्रमोदच्या प्रेमात मंगलाबाई बहकली होती. तिला पती विलास पाटील पेक्षा प्रियकर प्रमोद शिंपी जवळचा वाटत होता. त्यामुळे ती प्रमोदला भेटण्यासाठी त्याच्या शेतात जात होती. आपली आई कामावर जाण्याऐवजी प्रमोदला भेटण्यासाठी विखरण येथे जात असल्याचे तिचा एकुलता मुलगा प्रशांत यास समजत होते. प्रशांत हा चौदा वर्षाचा बालक होता. आपली आई मंगलाबाईचे विखरण येथील प्रमोदसोबत असलेले प्रेमसंबंध त्याला समजत होते. एके दिवशी तो आईसोबत प्रमोदच्या शेतात गेला. त्यावेळी प्रमोदचे त्याच्या आईसोबत सुरु असलेले फाजील चाळे त्याने पाहिले. त्यामुळे त्याला प्रमोदबद्दल घृणा निर्माण झाली. तिने प्रमोदसोबत संबंध ठेवू नये असे त्याच्या बालमनाला वाटत होते. ते स्वाभाविक होते. आपल्या मुलाने प्रमोदसोबतचे संबंध बघू नये म्हणून ती मुलाला घरी सोडून एकटीच प्रमोदच्या शेतात जावू लागली. मुलगा सोबत नसला म्हणजे तिला मुक्तपणे प्रमोदसोबत प्रेमाचे रंगीले चाळे करण्यास रान मोकळे मिळत होते. आपली आई नक्कीच प्रमोदसोबत चाळे करत असणार याची प्रशांतच्या बालमनाला चाहुल लागत होती. त्यामुळे तो तिला वारंवार फोन करुन घरी केव्हा येणार याची विचारणा करुन हैरान करुन सोडत होता. जिथे असेल तेथून व्हिडीओ कॉल कर असा तो तिला आग्रह करु लागला होता. मी घरी पप्पांना सर्व काही सांगेन असे म्हणत तो तिच्याशी वाद घालत होता. प्रशांतच्या माध्यमातून आपले व प्रमोदचे अनैतीक संबंध उघड होणार अशी भिती मंगलाबाईला सतावू लागली.
आपला मुलगा प्रशांत आपल्या व प्रमोदच्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याचे मंगलाबाईच्या लक्षात आले. ती सावध झाली होती. त्यामुळे तिने थेट आपल्या पोटच्या गोळ्याला प्रियकर प्रमोदच्या माध्यमातून ठार करण्याचे नियोजन केले. तिने याबाबत प्रियकर प्रमोदला सांगितले. पुरुषोत्तमचे काय करायचे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी मंगलाबाईने प्रमोदला 10 जानेवारी रोजी जामनेर तालुक्यातील नेरी येथे तिच्या माहेरी नेले. तेथेच चौदा वर्षाच्या प्रशांतच्या हत्येचा कट रचण्यात आला. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी प्रशांतला घेण्यासाठी प्रमोद तिच्या घरी आला. मात्र त्या दिवशी तो प्रमोदसोबत गेला नाही. त्यामुळे 14 जानेवारीच्या दिवशी त्याच्या हत्येचे नियोजन कोलमडले.
प्रशांत यास कबुतरे पाळण्याचा छंद होता. हाच धागा पकडून कबुतरे ठेवण्याचा पिंजरा घेऊन देण्याचा बहाणा करत प्रमोद त्याच्याकडे 16 जानेवारी रोजी आला. कबुतरांचा पिंजरा घ्यायला जाऊ असे आमिष दाखवत प्रमोदने प्रशांतला महामार्गावर बोलावले. मंगलाला सर्व नियोजन अगोदरच माहिती होते. त्यामुळे तिने आपल्या पोटच्या गोळ्याला ठार करण्यासाठी त्याला प्रियकर प्रमोदसोबत जाण्यास प्रवृत्त केले. तू काकासोबत कबुतरांचा पिंजरा घेण्यासाठी जा असे सांगून तिने त्याला पाठवले. प्रमोदने त्याचा साथीदार गणेश उर्फ राजू सुभाष वानखेडे (28), रा.भातखेडे ता. एरंडोल याला देखील सोबत आणले होते. गणेशच्या मोटार सायकलवर प्रशांतला मधोमध ट्रिपलसिट बसवून थेट बहाणपूरच्या जंगलात नेण्यात आले. आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत याची कल्पना चौदा वर्षाच्या प्रशांतला आली नव्हती. तो त्याच्या जीवनातील अखेरचा दिवस होता. वाटेत रावेर येथे प्रमोदने प्रशांतला गळफस देण्याच्या उद्देशाने दोर घेतला.
बुरहानपूरच्या जंगलात जाण्याआधी प्रमोदने त्याचा साथीदार गणेश यास आपण भानामतीसाठी फुले घ्यायला जात असल्याचे सांगितले होते. जंगलात पोहचल्यावर प्रमोदने गणेशला एका ठिकाणी बसवून ठेवले. त्यानंतर प्रमोद व प्रशांत असे दोघेच जण जंगलात गेले. प्रशांत पुढे पुढे चालत असतांना प्रमोदने मागच्या मागे हातातील दोरीचा फास तयार केला. तो फास प्रमोदने प्रशांतच्या गळ्यात टाकला. त्यानंतर काटेरी झाडावर दोरीचा दुसरा भाग फेकून प्रशांतला वर ओढण्यास सुरुवात केली. हातपाय झटकत असलेल्या प्रशांतकडे निर्दयी नजरेने बघत जीव जाईपर्यंत प्रमोद दोरीचा दुसरा भाग ओढतच राहिला. जीव गेल्यावर त्याला तसेच फासावर लटकलेल्या अवस्थेत सोडून तो बाहेर आला. गणेशने त्याला प्रशांत कुठे आहे अशी विचारणा केली. तो काही दिवसानंतर फुले मिळणार असून तो तेव्हाच येणार असल्याचे प्रमोदने गणेशला खोटे कथन केले. प्रशांतला माझ्या मित्राकडे राहू दिले असल्याचे गणेशला खोटे सांगून प्रमोदने वेळ मारुन नेली. त्यानंतर रावेर, हतनूर धरण, भुसावळमार्गे प्रमोदने थेट एरंडोल गाठले.
16 जानेवारी पासून घरातून गेलेला प्रशांत घरी आलाच नाही. त्यामुळे त्याचे वडील विलास पाटील हैरान झाले. आपला पोटचा मुलगा घरी परत आला नसल्याने ते त्याच्या भेटीसाठी व्याकुळ झाले. प्रशांतच्या जिवाचे काय झाले याबाबत मंगलाबाईला सर्व ठाऊक होते. तरीदेखील तिने चिंता व्यक्त करण्याचा देखावा सुरु केला. मुलगा घरी आला नाही म्हणून विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या अपहरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. रामकृष्ण कुंभार यांनी याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक नयन पाटील यांच्याकडे गुन्हयाचा पुढील तपास सोपवला. पोलिस आपल्या पातळीवर तपास करत असतांना मंगलाबाई मुद्दाम मुलगा सापडत नाही म्हणून पोलिसांच्या कामत अडथळा आणत होती.
मुलगा सापडत नाही म्हणून मंगलाबाईने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत व्यथा कथन केली आणि पोलिसांची तक्रार केली. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी याप्रकरणी बारकाईने लक्ष घालत तपास करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहायक फौजदार विजय पाटील, वासुदेव मराठे, सतीश हळणोर, चेतन पाटील, बापू पाटील, पोपट सोनार, विजय दुसाने, विश्वनाथ गायकवाड, मनोज पाटील, तुषार जोशी, नाना मोरे व अशोक महाले यांनी विविध पद्धतीने तपासाला सुरुवात केली होती.
मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार प्रमोद व प्रशांत हे दोघे जण घटनेच्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात तसेच मध्य प्रदेशातील जंगलात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिस तपास पथकाने 25 जानेवारी रोजी प्रमोदला विखरण येथून ताब्यात घेत चौकशी सुरु केली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणारा प्रमोद पोलिसी झटका मिळताच पोपटासारखा बोलू लागला. पुढील टप्प्यात तो पोलिस पथकाला थेट मृतदेहाजवळच घेऊन गेला. मृतदेह बघून त्याच्या वडीलांना अश्रू अनावर झाले. बुरहानपूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमोद जयदेव शिंपी (38) रा. विखरण ता. एरंडोल जिल्हा जळगाव याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला व त्याची विवाहीत प्रेयसी मंगलाबाई विलास पाटील (जलराम नगर सावखेडा शिवार जळगाव) अशा दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (14), रा.जलाराम नगर, सावखेडा शिवार याच्या हत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा जळगाव तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 22/2022 भा.द.वि. 363, 302, 34, 120(ब) प्रमाणे दाखल करण्यात आला. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने आईने थेट आपल्या पोटच्या गोळ्यालाच मृत्यूच्या दाराशी नेऊन ठेवल्याचे तपासात उघड झाले. मयत प्रशांतची आई जेलमधे गेल्याने घरात केवळ त्याचे वडील व लहान बहिण असे दोघेच राहिले. अनैतीक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो हे या घटनेतून पुन्हा एकवेळा सिद्ध झाले.