मानवी हाडांचा सापळा दडला होता बंद घरात ; सतरा महिन्यांनी खूनाची वार्ता समजली दारात

बोईसर : गुन्हा आणि गुन्हेगार कुठेतरी कच्चा असतो, त्यामुळेच पोलिस तपास पक्का होत असतो. गुन्हा आणि गुन्हेगार यांच्यात कुठेतरी कच्चा दुवा नक्कीच राहिलेला असतो. तो कच्चा दुवा शोधून काढण्याचे कसब पोलिस यंत्रणेचे असते. त्या कच्च्या दुव्यामुळे तपासाची दिशा मिळत असते. पोलिस यंत्रणा सुतावरुन स्वर्ग गाठण्याच्या प्रयत्नात असते. गुन्हेगार कितीही प्रबळ असला तरी त्याच्या हातून घाईगर्दीत कोणतीतरी चुक होत असते. त्याच्या हातून कोणातातरी धागा सुटलेला असतो. ती चूक अथवा तो धागा गुन्हेगाराने घटनास्थळाच्या परिसरातच सोडलेला असतो.

महिलेच्या हाडांचा सापळा

तो कच्चा दुवा अथवा कच्चा धागा अर्थात पुरावा पोलिसांना आपल्या पारखी नजरेने हेरायचा असतो. तो धागा हेरण्यासाठी पोलिस उप निरिक्षकापासून पोलिस अधिक्षकांपर्यंत असलेले अधिकारी आपआपल्या कसोटीच्या बळावर तपास लावत असतात. पोलिस अधिकारी आपल्या बुद्धीमत्तेचा आणि कर्मचारी  प्रसंगानुरुप आपल्या मसल पॉवरच्या वापर गुन्हयाच्या तपासात करत असतात.  

बोईसर पोलिसांनी सुद्धा अशीच एक तपासाची किमया करून दाखवली आहे. एका विवाहितेचा खून करून फरार झालेला तिचा पती, सासू, सासरे आणि नणंद यांना तब्बल दीड वर्षांनी अटक करण्यात यश मिळवले. घरभाड्याच्या रकमेचे हस्तांतरण अर्थात मनी ट्रान्सफर ज्या दुकानातून झाले होते त्या दुकानाचा शोध लावून पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.

हरयाणा राज्यातील गुरुग्राम येथून चौघा आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपीने भाड्याच्या खोलीत त्याच्या पत्नीचा खून केला होता. पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह त्याने एका पिंपात टाकून ठेवला होता. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासह फरार झाला होता. आपल्या गुन्हयाची वाच्यता होवू नये म्हणून त्याने त्याच्या ताब्यातील भाड्याचे घर बंद करुन ठेवले होते.

त्या बंद घराचे भाडे तो पळून गेलेल्या गावावरुन घरमालकाला नियमित पाठवत होता. मात्र लॉकडाऊनमुळे चार महिन्याचे भाडे तो घरमालकाला पाठवू शकला नाही. त्यामुळे घरमालकाने दुसरा भाडेकरी ठेवण्याचा विचार केला. त्यासाठी घरमालकाने ते घर उघडले. घरात प्रवेश केल्यानंतर मानवी हाडांचा सांगाडा सर्वांच्या नजरेस पडला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका काही क्षणासाठी चुकला.

घरमालकाने ते घर दुसऱ्याला भाड्याने देण्यासाठी उघडले नसते तरी देखील अजून उशीरा का होईना हे प्रकरण उग्र वासामुळे उघडकीस आलेच असते. बोईसर पोलिसांनी आपल्या कौशल्याचा वापर करत या हत्येचा तपास करून आरोपींना बेड्या ठोकत पकडून आणले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोईसर शहरातील गणेश नगर भागात लोकेश मारवाडी चाळ आहे. या चाळीत दीपक झा नावाचा व्यक्ती आपल्या परिवारासह रहात होता. त्याच्या कुटुंबात पत्नी बुलबुल, वडिल पवन, आई बच्चीदेवी आणि बहिण नीतू असा पाच जणांचा परिवार होता. दरम्यान बुलबुलचे पती दिपक सोबत वाद होत असत.  ती पती दिपकसोबत नेहमीच वाद घालत असे.

या नेहमीच्या वादाला वैतागून सन 2017 मध्ये दीपक झा याने बुलबुल हिस जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यात ती बचावली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक व त्याच्या आई-वडिलांना अटक झाली होती. ते तीन महिने तुरुंगवारीसाठी गेले होते. दरम्यानच्या काळात दीपकचे आई-वडिल आणि नणंद ही तक्रार मागे घेण्यासाठी बुलबुलवर सारखा दबाव टाकत होते. पण ती कुणाचेच ऐकत नव्हती. दरम्यान दीपक व आई-वडिल जामीनावर सुटून बाहेर आले. जेलमधून बाहेर आल्यानंतर दिपकने पुन्हा पत्नी बुलबुल हिस मारहाण सुरु केली.

आता नेहमीच्या त्रासाला दिपक पार वैतागला होता. त्याने पत्नी बुलबुलचा कायमचा नायनाट करण्याचे मनाशी ठरवले होते. याकामी त्याला कुटूंबातील लोकांची साथ मिळणार होती. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने फेब्रुवारी 2019 मध्ये दिपकने पत्नी बुलबुलची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. दिपकने तिचा मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये कसाबसा कोंबला. तिचा मृतदेह असलेला तो ड्रम बाथरुममध्ये ठेवून सर्व कुटुंब फरार झाले.

आम्ही सर्व जण आमच्या गावी जातो, खोली बंदच राहू द्या. तुमचे घरभाडे तुम्हाला दरमहा नियमीत मिळेल असे दिपकने खोली मालकाला जातांना आवर्जुन सांगितले. त्यानंतर तो दरमहा खोलीमालकाला भाड्याचे पैसे ऑनलाईन पाठवू लागला. हा प्रकार नित्यनेमाने दरमहा सुरु होता. भाड्याचे पैसे नियमित मिळत असल्यामुळे घरमालक देखील तक्रार करत नव्हता.

मात्र मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन सुरु झाले. लॉकडाऊनमुळे ज्याप्रमाणे बहुतेक जणांची आर्थिक कोंडी झाली तशी दिपकची देखील झाली. दिपककडे चार महिन्याचे घरभाडे थकले. त्यामुळे खोली मालक लोकेश जैन यांचा वैताग वाढला. त्यांनी ती खोली दुस-या भाडेक-यास देण्याचे ठरवले. गेल्या दीड वर्षांपासून ती खोली बंदच होती. खोली मालक लोकेश जैन यांनी ते घर उघडताच आतून अतिशय उग्र दर्प बाहेर आला. त्या खोलीत पाय ठेवणे कठीण झाले. काहीतरी गडबड असल्याचे जैन यांच्या लक्षात आले.

घरमालक लोकेश जैन यांनी बोईसर पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. माहिती मिळताच बोईसर पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले. घराची बारकाईने तपासणी केली असता बाथरुम मधील ड्रममधून मानवी हाडांचा सांगाडा सर्वांच्या नजरेस पडला. भाडेकरी दिपक झा व त्याच्या परिवाराला फोन लावला असता त्यांचे फोन बंद येत होते. या प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. २३४/२०२० प्रमाणे कलम ३०२, २०१ व ३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर परिसरात मोठी खळबळ माजली. बोईसर पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रदिप कसबे यांनी या प्रकरणी तपास सुरु केला.

दिवसामागून दिवस जात होते. मात्र या गुन्हयाचा तपास लागत नव्हता. फरार झालेल्या झा परिवाराचे मोबाईल देखील बंद येत होते. त्यामुळे त्यांचा कुठलाही ठावठिकाणा समजण्यास मार्ग नव्हता. दरम्यान दीपक झा घरभाड्याचे पैसे ज्या मनी ट्रान्सफर दुकानातून ऑनलाईन पाठवत होता त्याचा शोध घेण्यात आला. ते दुकान हरयाणा राज्यातील गुरुग्राम येथील होते.

त्या मनी ट्रान्स्फर दुकानाचा शोध लावण्यात अखेर बोईसर पोलिसांना यश आले. पो.नि. प्रदिप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांचे एक पथक गुरुग्राम येथील त्या दुकानावर पोहोचले. दरम्यान पोलिस आपल्या मागावर असल्याची खबर आरोपींना लागली. त्यामुळे ते पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र अतिशय नियोजनबद्ध रित्या झा परिवारास अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले.

यात मयत बुलबुलचा पती दीपक झा, त्याचे वडिल पवन झा, आई बच्चीदेवी झा आणि बहिण नीतू ठाकूर यांचा समावेश होता. त्यांना बोईसर पोलिस स्टेशनला आणले गेले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी सुनावली. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक आशिष पाटील, पो.हवालदार दुसाने, जमादार थोरात आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here