जळगाव : क्रेडीट कार्ड अॅक्टीव्हेट करण्यात अडचण आल्याने टोल फ्री क्रमांकावर पलीकडून बोलणा-या व्यक्तीने सहा आकडी पिन संबंधीत कार्डधारकास विचारला. त्यानंतर कार्डधारकाच्या बॅंक खात्यातून एकुण 30 हजार 937 रुपये वजा झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर क्रेडीट कार्ड धारक तरुणाने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविणकुमार दशरथ खरात असे फसवणूक झालेल्या वाहन चालक कार्डधारकाचे नाव आहे.
प्रविणकुमार खरात यास डिसेंबर 2021 या कालावधीत क्रेडीट कार्डची फोनद्वारे विचारणा झाली होती. होकार दिल्यानंतर काही दिवसांनी एक अनोळखी इसम कागदपत्रांच्या पडताळणीच्या बहाण्याने त्यांच्या घरी आला. आलेल्या अनोळखी इसमाने खरात यांचा फोटो काढून आधार, पॅन स्कॅन करुन नेले. काही दिवसांनी घरी आलेले क्रेडीट कार्ड सक्रीय करतांना खरात यांना अडचणी आल्या. त्यामुळे टोल फ्री क्रमांकावर बोलत असतांना विविध प्रक्रीया पलीकडून बोलणा-याने त्यांना सांगीतल्या. दरम्यान आलेला सहा आकडी पिन त्याने बोलण्याच्या ओघात खरात यांना विचारला. तो पिन सांगितल्यानंतर खरात यांची फसवणूक झाली. बॅक कुणालाही ओटीपी, पिन अथवा खासगी माहिती विचारत नाही हे वेळोवेळी सांगीतले जात असते.