औरंगाबाद : दौलताबाद पोलिस स्टेशनला ड्युटीवर जाण्यापुर्वीच पोलिस उप निरिक्षक रविकिरण आगतराव कदम यांना लाचेच्या स्वरुपात लक्ष्मीचे दर्शन झाले. मात्र हातात पडलेल्या धनराशीचा खिशातील मुक्काम अल्पकाळ ठरला. पोलिस स्टेशनला जाण्यापुर्वीच त्यांना एसीबीच्या कार्यालयात जाण्याचा प्रसंग आला. मंगळवार 15 फेब्रुवारी लाचेच्या सापळ्यात पोलिस उप निरिक्षक रविकिरण कदम सापडल्यानंतर औरंगाबाद पोलिस दलात खळबळ माजली आहे.
28 जानेवारी रोजी सुसाट चारचाकीने दिलेल्या धडकेत वृद्धाचा अपघाती मृत्यु झाला होता. मयत वृद्धाच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रत गरजेची होती. त्यासाठी मयत वृद्धाच्या मुलाने संबंधीत पोलिस उप निरीक्षक रविकिरण कदम यांची भेट घेतली होती. पंचनामा करण्यासाठी फौजदार कदम यांनी मयत वृद्धाच्या मुलाकडे दहा हजार रुपयांची लाच मागीतली होती. अगोदरच वडीलांच्या निधनाने शोकसंतप्त असलेला मुलगा लाचेच्या मागणीमुळे अजून संतप्त झाला होता. मात्र त्याची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने एसीबीचे अधिक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे 14 फेब्रुवारी रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. एसीबीच्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
ठरल्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. दौलताबाद पोलिस स्टेशनला ड्युटीवर जाण्यापुर्वीच फौजदार कदम यांनी तक्रारदारास जुन्या पोलिस स्टेशनच्या इमारतीसमोर हजर राहण्यास सांगीतले. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्यांच्यावर झडप घातली. सन 2015 च्या बॅचचे पोलिस उप निरीक्षक असलेले रविकिरण कदम यांना एसीबीने ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली. या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ कदम यांच्यावर आली.