जळगाव : विवाहितेची वारंवार छेडखानी करुन तिला जेरीस आणणा-या मवाली वृत्तीच्या जितेंद्र बच्छावत या तरुणाला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विवाहितेचा पती परगावी कामानिमीत्त गेल्याचे बघून या तरुणाने विवाहितेची छेडखानी करण्याचा जणू पिच्छाच पुरवला होता. अखेर घाबरलेल्या विवाहितेने परगावी गेलेल्या तिच्या पतीला बोलावून घेत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
खेडी शिवारात राहणा-या विवाहितेचा पती कामानिमीत्त परराज्यात गेला होता. घरी तिचा मुलगा व पुतण्या असे तिच्यासोबत होते. विवाहिता रहात असलेल्या घरासमोर जितेंद्र बच्छावत हा त्याच्या आईसोबत राहतो. त्याची या विवाहितेवर वाईट नजर असते. तिचा पती घरी नसल्याचे बघून तो नेहमी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. दळणाला जातांना तसेच रस्त्याने भाजीपाला घेत असतांना त्याने वेळोवेळी तिची छेड काढली. त्याने तिच्या केसांना लावलेले क्लचर काढल्याने ती जास्तच घाबरली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परराज्यात गेलेला विवाहितेचा पती जळगावला परत आला. त्याने जितेंद्र बच्छावत यास समजावण्याचा प्रयत्न करुन देखील तो ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याने उलट दोघा पती पत्नीला शिवीगाळ करत तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, मी तुमची गाडी फोडून टाकेन असा दम दिला. अखेर विवाहितेने आपल्या पतीसह एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत जितेंद्र बच्छावत याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील आदींनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील करत आहे. परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक आशित कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.