नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): गोरख काशिनाथ बच्छाव हा तरुण नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील रहिवासी होता. तरुणपणात पदार्पन केलेला गोरख उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचा मार्ग शोधत होता. दरम्यान मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील गोरखचे नातेवाईक गोकुळ सोनवणे यांनी त्याला रोजगारासाठी आपल्याकडे बोलावून घेतले. तो गोकुळ सोनवणे यांच्याकडे राहण्यास आला. गोकुळ सोनवणे यांनी त्याला प्लंबिंगचे काम मिळवून दिले. रावळगाव येथील गोकुळ सोनवणे यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. गोकुळ सोनवणे यांना कल्याणी नावाची मुलगी आहे. गोकुळ सोनवणे यांच्या परिवारात राहून गोरखने प्लंबीगच्या कामात जम बसवला. प्लंबींगच्या कामातून त्याला धनप्राप्ती होऊ लागली. दरम्यान गोकुळ सोनवणे यांची मुलगी कल्याणी व गोरख यांचा सहवास जुळून आला.
गोकुळ सोनवणे यांची मुलगी कल्याणी देखील तरुण झाली होती. ती तेवीस वर्षाची झाली होती. गोरख हा देखील लग्नायोग्य झाला होता. कल्याणी देखील लग्नायोग्य झाली होती. गोकुळ सोनवणे यांच्या एकत्र कुटूंबात कामधंद्यानिमीत राहणा-या गोरखचे कल्याणीवर प्रेम जडण्यास वेळ लागला नाही. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची पालवी फुटण्यास सुरुवात झाली. दोघे एकमेकांकडे आकर्षीत झाले. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गोरख आणी कल्याणी हे दोघे नात्यातीलच असल्यामुळे दोघांच्या लग्नाला कुणाचा तसा विरोध नव्हता. दोघांच्या प्रेमाविषयी घरात सर्वांना समजले होते.
दरम्यान लग्नायोग्य झालेल्या कल्याणीला इतर नातेवाईकांच्या माध्यमातून स्थळ येण्यास सुरुवात झाली होती. कल्याणी व गोरख यांच्यातील प्रेमसंबंधाची कुणाला माहिती नसल्यामुळे तिला स्थळ येत होते. तिचे गोरखसोबत लग्न करण्यास कुणाचा नकार नव्हता. मात्र दरम्यानच्या कालावधीत तिला येणारे स्थळ गोरखपेक्षा चांगल्या स्वरुपाचे होते. गोरखपेक्षा चांगली कमाई करणा-या उच्च शिक्षीत तरुणांचे ते स्थळ होते. त्यामुळे साहजीकच तिचे वडील गोकुळ सोनवणे आणी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे विचार व्यावहारिक झाले. गोरखपेक्षा चांगल्या प्रकारचे स्थळ कल्याणीसाठी चालून येऊ लागल्यामुळे त्यांचे गोरखवरील लक्ष बाजुला झाले. त्यामुळे कल्याणी देखील त्याला टाळू लागली. त्यामुळे आता कल्याणीचा देखील कल चांगल्या स्थळाच्या बाजुने होऊ लागला. एकंदरीत गोरख व कल्याणी यांच्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली. चालून आलेली काही स्थळे कल्याणीने पसंत देखील केली. मात्र का कुणास ठाऊक, आलेली स्थळे नंतर नकार देऊ लागली. काही ना काही कारणाने येणारे स्थळ कल्याणीला नापंसत करु लागले. गोरखमुळेच हाती आलेली चांगली स्थळे नकार देत असल्याचा कल्याणी व तिच्या परिवाराला संशय येऊ लागला.
या संशयाची जागा आता वादाने घेतली होती. कल्याणीसह परिवारातील सर्व जण गोरखला दोष देत त्याच्यावर चिडले होते. कल्याणीच्या लग्नात आडकाठी का आणतोस म्हणून सर्वांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. मात्र आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणत त्याने कानावर हात ठेवले. जुळून येणारी स्थळे दुरावत असल्यामुळे घरातील सर्वच जण चिंताग्रस्त होती. गोरखमुळेच कल्याणीच्या ठरणा-या विवाहात अडथळा येत असल्याचा सर्वांचा समज झाला होता. जोपर्यंत गोरख आहे तोपर्यंत कल्याणीच्या विवाहात अडथळा येतच राहील असे सर्वांना वाटू लागले. त्यामुळे गोरखला कायमचा धडा शिकवला पाहिजे या निर्णयाप्रत सर्वजण आले होते. तरीदेखील एक संधी म्हणून त्याला समजावून बघू असे सर्वांनी मिळून ठरवले.
शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारच्या वेळी कल्याणी, तिचे आई-वडील व दोघे भाऊ असे सर्व जण रावळगाव येथून गोरखच्या गावी लोहणेर येथे आले. गोरख वासुलपाडे रस्त्यावर उभा असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे सर्वांनी त्याची तेथेच भेट घेत बोलण्यास सुरुवात केली. आता कल्याणीचा नाद सोड आणी तिच्या लग्नात अडथळा आणू नको असे सर्वांनी मिळून त्याला सांगण्यास सुरुवात केली. मात्र तो कुणाचे ऐकून घेत नव्हता. माझे कल्याणीवर प्रेम आहे व मी तिच्याशीच लग्न करेन असे तो सर्वांना वारंवार सांगत होता. कल्याणीचा नाद सोडण्यास सर्व जण सांगत होते. मात्र लग्न करेन तर कल्याणीसोबतच असा हेका त्याने लावला होता. आता कल्याणीलाच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. तरी देखील तो जिद्दीला पेटला होता. दोन्ही बाजुने सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर सोनवणे परिवाराकडून गोरखवर हल्ला करण्यात आला. त्याला शिवीगाळ करत लोखंडी रॉड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु झाली.
पाचही जण त्याच्यावर एकदम तुटूनच पडले. एकीकडे पाच जण व तो एकटा पडला होता. त्याला लोखंडी रॉडने मारहाण सुरु असतांना जिवाच्या आकांताने तो जवळच असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात गेला. त्याचवेळी चिडलेल्या कल्याणीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले. काही कळण्याच्या आतच तिने पेटती आगकाडी त्याच्या दिशेने भिरकावली. क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी त्याला वेढले. जिवाच्या आकांताने सैरभैर होत तो इकडे तिकडे धावू लागला. कुणीही त्याच्या मदतीला आला नाही. अखेर होरपळून दमल्यानंतर तो जमीनीवर पडला. त्यानंतर आलेल्या सोनवणे परिवाराने तेथून पलायन केले.
या घटनेची माहिती समजताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, देवळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो सुमारे 80 टक्के भाजला होता. पोलिसांनी तातडीने कल्याणी गोकुळ सोनवणे (23), गोकुळ तोंगल सोनवणे (57), निर्मला गोकुळ सोनवणे (52), हेमंत गोकुळ सोनवणे (30) व प्रसाद गोकुळ सोनवणे (26), सर्व रा. रावळगाव यांना लागलीच ताब्यात घेतले.
रुग्णालयात उपचार सुरु असतांना पोलिसांनी गंभीर जळीत असलेल्या गोरख काशीनाथ बच्छाव याचा जवाब नोंदवला. कल्याणीवर आपले गेल्या सात वर्षापासून प्रेम असल्याचे त्याने पोलिसंना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. तिचे वडील गोकुळ सोनवणे यांचा आमच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे आमचे बोलणे बंद झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. माझे तिच्यावर आजही प्रेम असून माझ्यामुळेच तिचे लग्न मोडले असा त्यांचा समज झाला असे त्याने कथन केले. 11 फेब्रुवारी 2022 रोजी कल्याणीचा भाऊ हेमंतने आपल्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. प्रसादने लोखंडी रॉड मारुन जखमी केले. गोकुळ सोनवणे यांनी धरुन ठेवल्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्याच्या जवाबानुसार गोकुळ तोंगल सोनवणे, हेमंत उर्फ पप्पू गोकुळ सोनवणे, प्रसाद गोकुळ सोनवणे, कल्याणी गोकुळ सोनवणे व निर्मला गोकुळ सोनवणे या पाचही जणांविरोधात देवळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 52/2022 भा.द.वि. 307, 34 नुसार नोंद करण्यात आला. उपचार सुरु असतांना 14 फेब्रुवारी रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे सर्व आरोपींविरुद्ध खूनाचे कलम वाढवण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास देवळा पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप लांडगे व सहकारी करत आहेत.