पुजा विधीच्या नावाखाली साडेपाच तोळे सोने लंपास

औरंगाबाद : पती-पत्नीमधील वाद मिटवण्याचा नावाखाली भोंदू दाम्पत्याने हातचलाखीने साडेपाच तोळे वजनाचे दागिने लांबवले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज भागात करण्यात आलेल्या या कारवाईत अबिद रशीद आणि नगिना खान (दोघे रा. गाझियाबाद, दिल्ली) या भोंदू दाम्पत्याला अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

शाकेरा वजीर शेख (32) ही विवाहीता 5 फेब्रुवारी रोजी कपडे खरेदीच्या निमीत्ताने शहागंज परिसरात आली होती. त्यावेळी या विवाहितेला एक जाहीरात पत्रक दिसले. त्या पत्रकावर ‘पती-पत्नी, कौटुंबिक वाद होऊ नये यावर रामबाण उपाय’ अशा मजकुराची जाहिरात होती. त्या मजकुरातील नमुद मोबाइल क्रमांकावर शाकेरा या विवाहितेने संपर्क साधला. पलीकडून बोलणा-या नगिना हिने शाकेरा या विवाहितेस तिची समस्या विचारली. उपाय सांगतांना नगिना खान हिने पूजा (विधी) करावी लागेल असे शाकेरा हिस सांगितले. येतांना सोबत दागिने घेऊन येण्यास  उस्मानपुऱ्यातील जामा मशीद समोरील आलिशान कॉम्प्लेक्सच्या गाळा क्र. 2 येथे बोलावले. 6 फेब्रुवारी रोजी शाकेरा तेथे गेल्यावर तिच्याकडून सर्व कौटूंबिक व वैयक्तीक तपशील भोंदू दाम्पत्याने विवाहितेस विचारुन घेतला.

विधीदरम्यान भोंदू दाम्पत्याने जमिनीवर एक रुमाल अंथरला. त्यावर शाकेरा या विवाहितेस तिच्या ताब्यातील दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानुसार रुमालावर ठेवलेल्या दागिन्यांना भोंदूंनी गाठ मारली. घरी गेल्यावर ती गाठ उघडण्यास सांगितली. घरी आल्यावर रुमालात दागिन्यांऐवजी पिठाचा गोळा असल्याचे शाकेरा या विवाहितेस दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात गुन्हा  दाखल करण्यात आला. दोघा भोंदूंना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here