औरंगाबाद/पुणे : प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या पोटच्या गोळ्यांना खुद्द जन्मदात्या मातांनीच ठार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील घटनेत जन्मदात्रीने आपल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुस-या घटनेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील अशीच दुसरी घटना उघडकीस आली आहे. जुन्नर तालुक्यातील घटनेत मातेने आपल्या मुलाची परकरच्या नाडीने गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधात अडसर हा सामायीक विषय दोन्ही घटनांमधे आहे. जळगाव शहरात देखील अशीच एक घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली होती.
सार्थक रमेश बागुल (9) असे खंडाळा ता. वैजापूर येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप बालकाचे नाव आहे. या बालकाची आई संगिता रमेश बागुल (35) हिने प्रियकराच्या मदतीने आपला मुलगा सार्थक याची हत्या केली आहे. या घटनेतील कुमाता संगीता हिस पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस कारवाईच्या भितीने संगिता बागुल हिच्या प्रियकराने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. 11 फेबुवारी रोजी मुलगा खेळायला गेला व परत आला नसल्याबाबत खंडाळा येथील रहिवासी असलेल्या संगीता रमेश बागूल हिने वैजापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी तलवाडा शिवारातील डोंगरात शिऊर पोलिसांना त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेत अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने खून झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दुचाकीवरुन चक्कर मारण्याच्या बहाण्याने मुलाला प्रियकर घेऊन गेल्यानंतर त्याची निर्जनस्थळी हत्या करण्यात आली. मुलगा हरवल्याचा बनाव या घटनेत करण्यात आला होता.
दुस-या घटनेत पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे असाच प्रकार उघडकीस आला आहे. 27 जानेवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी व तपासाअंती या घटनेत आईनेच परकरच्या नाडीने मुलाची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेतील आईला पोलिसांनी अटक केली आहे. विद्या सचिन कदम असे या घटनेतील कुमातेचे नाव असून तिने आपल्या राज नावाच्या तेरा वर्षाच्या बालकाची तो झोपेत असतांनाच हत्या केली आहे. मयत बालकाच्या मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर त्याचा घातपात झाल्याचे उघडकीस आले. मयत बालक राज कदम याचे वडील सचिन शंकर कदम यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.