जळगाव : शेतक-याच्या शेतातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करुन ती परस्पर विक्री करणा-या तिघांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे. भडगाव पोलिस स्टेशनला दाखल ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड झाला आहे.
भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शेतक-याची चोरी झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धुळे तालुक्यातील बोरकुड येथे परस्पर विक्री झाली होती. भडगाव येथील तिघा चोरट्यांनी ती बोरकुड येथील खरेदीदारास विक्री केल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजले. त्या माहितीच्या आधारे त्यांनी स.पो.नि.अमोल देवढे, हे.कॉ.सुनिल दामोदरे,लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, पोलिस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, इश्वर पाटील, चालक हे.कॉ. राजेंद्र पवार, मुरलीधर बारी आदींना बोरकुड येथे तपासकामी रवाना केले. प्रविण मदन मालचे (रा.वलवाडी, भडगाव), संदीप उर्फ तात्या आनंदा भिल (भोरटेक- भडगाव), गोरख ठाकरे या तिघांनी चोरीची ट्रॅक्टर ट्रॉली बोरकुड येथील तरुणाला 60 हजार रुपयात विक्री केल्याचे तपासात उघड झाले. बोरकुड येथील ट्रॉली खरेदीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने भडगाव येथून प्रविण मदन मालचे यास अटक केली. यातील संदीप उर्फ तात्या भिल व गोरख ठाकरे हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. अटकेतील प्रविण मालचे यास ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुढील तपासकामी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.