जळगाव : जळगाव तालुक्यातील वसंतवाडी – जळके येथील रहिवाशास गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत माजवण्यासह महागडा मोबाईल हिसकावून नेणारे दोघे अद्याप फरार आहेत. याप्रकरणी मंगल हरी पाटील (वसंतवाडी जळके ता. जळगाव) यांनी पोलिस अधिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन 22 फेब्रुवारी रोजी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
मंगल हरी पाटील हे जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील वसंतवाडी – जळके येथे राहतात. शेती खरेदी – विक्रीचे त्यांचे व्यवहार चालतात. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडे ब-यापैकी धनसंपदा असल्याचे गावातील भास्कर पंडीत राखुंडे व शांताराम पंडीत राखुंडे यांच्या लक्षात आले होते. त्या माहितीच्या आधारे या दोघांनी गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना 18 फेब्रुवारी 2022 रोजी घडल्याचे मंगल पाटील यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मंगल पाटील हे त्यांच्या वसंतवाडी – जळके येथील घरी होते. त्यावेळी भास्कर पंडीत राखुंडे व शांताराम पंडीत राखुंडे यांनी मंगल पाटील यांना फोन लावून ते घरी आहेत का याची खात्री करुन घेतली. त्यानंतर मोटार सायकलने दोघे मंगल पाटील यांच्या घरी आले. आल्या आल्या दोघांनी मंगल पाटील यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरु केली. शांताराम राखुंडे याने आपल्या कब्जातील गावठी कट्टा मंगल पाटील यांच्या कानशिलाजवळ लावला. आम्हाला पैशांची गरज असल्याचे सांगत दोघांनी गुंडगिरी करत जेवढी रक्कम असेल तेवढी काढून देण्यास बजावले. रक्कम दिली नाही तर तुझा येथेच मुडदा पाडू अशी धमकी देखील दिली.
या घटनेची व्हिडीओ शुटींग करत असतांना दोघांनी मंगल पाटील यांचा तिस हजार रुपये किमतीचा मोबाईल झटापट करुन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघे यशस्वी झाले. दरम्यान शांताराम राखुंडे यांना मारहाण करत असतांना शांताराम राखुंडे याच्या हातातील गावठी कट्टा खाली पडला. मात्र तो देखील शिताफीने ताब्यात घेत मंगल पाटील यांना मारहाण करण्यात आली. मंगल पाटील यांनी आरडाओरड केल्यामुळे दोघांनी त्यांचा महागडा मोबाईल हिसकावून घेत मोटार सायकलने पलायन केले. या घटनेची माहिती मंगल पाटील यांनी रात्रीच्या वेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन दिली. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे मंगल पाटील यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा तपास होण्यासह योग्य ती कारवाई करुन दोघांना जेरबंद करावे, त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा हस्तगत करावा, आपला मोबाईल आपल्याला परत मिळावा अशा मागण्या मंगल पाटील यांनी तक्रार अर्जात केल्या आहेत.