जळगाव : कोरोना काळात पतीच्या मृत्युने अकाली विधवा झालेल्या महिलेची फसवणूक व बलात्कार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विधवा महिलेचा चुलत दिर, सासू व सासरा अशा तिघांचा या गुन्ह्यात समावेश आहे. 73 लाख 64 हजार 501 रुपयांसह सोन्या चांदीचे दागीने घेऊन यात फसवणूक झाली आहे.
पिडीत विधवा महिलेचा पती आयटी इंजीनिअर होता. सन 2020 या काळात कोरोनामुळे त्याचे निधन झाले. त्यानंतर चुलत दीर, सासू व सासरा अशा तिघांनी तिला माहेरी जावू दिले नाही. तिला दिरासोबत लग्नाचे आमिष दाखवण्यात आले. लग्नाचे आमिष दाखवत दिराने तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण केले. तिचा विश्वास संपादन करत तिच्या पतीच्या बॅंक खात्यातील 73 लाख 64 हजार 501 रुपयांची रक्कम वर्ग करुन घेतली. याशिवाय तिच्या मुलीचे 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील संगमनताने त्यांनी ठेवून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत विधवा महिलेने तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास पाटील करत आहेत.