जळगाव : हॉटेल मालकाच्या परवानगीविना सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन हॉटेल मालकाला दमदाटी, शिवीगाळ तसेच त्याच्या नातेवाईकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेविकेचे पती धुडकू सपकाळे यांच्यासह त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जळगाव औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल काशिनाथ नजीक महेश विष्णू रडे यांचे प्रभात रेस्टॉरंट आणि भरीत सेंटर आहे. या हॉटेलचे कामकाज बघण्यासाठी महेश रडे यांना त्यांचे मेहुणे हेमंत पाटील हे मदत करत असतात. 3 मार्च रोजी हॉटेल मालक महेश रडे यांच्या गैरहजेरीत धुडकू सपकाळे व इतर तिघे जण हॉटेलमधे आले होते. हॉटेलमधील कर्मचा-यांवर दडपण टाकून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. तुम्ही यांना सीसीटीव्ही फुटेज का चेक करु दिले अशी विचारणा यावेळी आलेले हॉटेल मालक रडे यांनी आपल्या कर्मचा-यांना केली. आपल्याबद्दल कर्मचा-यांना विचारणा केल्याचे बघून धुडकू सपकाळे यास राग आला. तु हॉटेल कशी काय चालवतो, तुझ्या हॉटेलची तोडफोड करु अशी धमकी देत धुडकू व त्याचे साथीदार हॉटेलच्या बाहेर निघून गेले.
काही वेळाने धुडकूने फोन करुन दुसरे दोन जण बोलावून घेतले. यावेळी सुरु असलेल्या भांडणाचा आवाज ऐकू आल्याने हॉटेल मालक महेश रडे यांचे मेहुणे हेमंत पाटील धावत आले. त्यांनी काय झाले म्हणून महेश रडे यांच्याकडे विचारणा केली. त्याचवेळी धुडकूच्या दोघा साथीदारांनी लाकडी दांडक्याने हॉटेलमधील दोघा कर्मचा-यांना मारहाण सुरु केली. महेश रडे व त्यांचे मेहुणे हेमंत पाटील यांनी या मारहाणीला हस्तक्षेप सुरु केला. त्याचवेळी धुडकूच्या एका साथीदाराने हेमंत पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका जोरात हाणला. या हल्ल्यात हेमंत पाटील जखमी झाले. दरम्यान धुडकूची महेश रडे यांना शिवीगाळ सुरु होती. शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार केल्यानंतर धुडकू व त्याचे दोघे साथीदार हॉटेलमधून निघून गेले. जखमी हेमंत पाटील यांना तातडीने एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक महेश रडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.