पाचशे रुपयांचा दंड, त्यात दोन दिवसांचा खंड!– सरकारी कामाची प्रचिती ट्रकचालकाला उदंड!!

सोलापूर : ए…… रोको…..रोको……रोको……..म्हणत ट्रकचालकाला सोलापूर येथील एका आरटीओ अधिका-याने अडवले. विस टन सोयाबीन भरलेला अवजड ट्रक महामार्गाने गुमान घेऊन जाणा-या ट्रकचालकाने क्लच, ब्रेक गिअरचा वापर करत कसाबसा थांबवला. आपला काय गुन्हा आहे याची विचारणा बिचा-या ट्रकचालकाने संबंधीत अधिका-याकडे केली. मुखावर मास्क लावला नाही म्हणून पाचशे रुपये दंड संबंधीत आरटीओ अधिका-याने ट्रकचालकाला आकारला. दंड भरुनच गाडी पुढे न्यायची अशी तंबी देऊन सदर अधिकारी निघून गेला मात्र दंड कुठे जमा करायचा पावती कुठून घ्यायची याचे ज्ञान अधिका-याने सदर ट्रकचालकाला दिले नाही.

अशिक्षीत ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील विस टन वजनाचा सोयाबीन भरलेला ट्रक आरटीओ कार्यालयात उभा केला व इकडे तिकडे भटकून दंड कुठे जमा करायचा याची विचारणा करु लागला. मात्र त्याची दादपुकार कुणी घेईना. अखेर त्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. थेट जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना भेटून पाचशे रुपये दंड कुठे जमा करायचा, विस टन सोयाबीन भरलेला ट्रक दोन दिवसांपासून उभा आहे असे देखील कथन केले. सोबतच ट्रकची सर्व कागदपत्र देखील त्यांच्या पुढ्यात ठेवली.

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी एमएच 14 बीजे 9090 वरील मिलींद नांदवरे या ट्रकचालकाचा पाचशे रुपयांचा दंड जमा करण्यास तहसिलदारांना आदेश केला. बिचारा ट्रकचालक तेथून दक्षीण तहसील कार्यालयात गेला. या दंडाची आकारणी आमच्याकडे येत नाही, तुम्ही उत्तर तहसील कार्यालयात जा असे सांगून त्याला रवाना केले. उत्तर तहसील कार्यालयाचा शोध घेत त्याने कार्यालय गाठले. त्याठिकाणी ट्रकचालकाने पाचशे रुपये दंड भरला. दंडाची पावती हातातून खिशात ठेवल्यानंतर त्याच्या चेह-यावर समाधानाची लकेर आली. डोक्यावरुन हिमालय पर्वत खाली उतरवल्यासारखे समाधान त्याच्या चेह-यावर आले. तेथून आरटीओ कार्यालयात उभा असलेला ट्रक ताब्यात घेत त्याने पुढील प्रवास सुरु केला. या सर्व घटनाक्रमात त्याचे दोन दिवस गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here