अजिंठा : उत्तर प्रदेशातून मित्रांसोबत पळून आलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तिच्या पालकांच्या सुपुर्द केले आहे. वयात बरीच तफावत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावले जात असल्यामुळे आणि विरोध करुनही उपयोग होत नसल्याचे बघून आपण पळून आल्याचे तिने म्हटले आहे. प्रतापगढ जिल्ह्यातील सांगेपूर येथील ही मुलगी सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील एका ढाब्यावर पोलिसांना आढळली होती. तिच्यासोबत असलेल्या तिच्या तिघा मित्रांना देखील ताब्यात घेण्यात आले. सर्वांची समजूत घालून तिच्या कुटूंबियांसमवेत रवाना करण्यात आले.
उत्तर प्रदेशात कमी वयात मुलींचे लग्न केले जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. सांगेपूर येथील अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीचे तिच्यापेक्षा बरेच अंतर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले जाणार होते. मुलीचा या विवाहाला प्रखर विरोध होता. त्यामुळे घर सोडून ती महाराष्ट्रात आली होती. अजिंठा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. अजित विसपुते यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तिला पोलिस स्टेशनला आणले. तिची व तिच्या मित्रांची विचारपूस करण्यात आली. तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर तिच्या पालकांना बोलावून घेण्यात आले.समज देऊन तिला पालकांच्या सुपुर्द करण्यात आले.