जालना : दहा लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने अंबड येथील 19 वर्षाच्या युवकाची लोखंडी रॉड व दगडाने हत्या करण्यात आली होती. 27 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी तिघांना अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रल्हाद सी. भगुरे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुनावला असून दंडाची रक्कम भरली नाही तर प्रत्येकी सहा महिन्यांचा कारावास देखील सुनावला आहे. नाथसागर ऊर्फ तुकाराम रामनाथ जाधव, अरुण कानिफनाथ मोरे, आकाश ऊर्फ गोट्या अशोक घोडे अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. गोविंद शिवप्रसाद गगराणी (19) असे या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायधिश जालना व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अंबड यांच्यासमक्ष प्रत्येकी पाच असे एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक देवीदास शेळके यांनी केला तसेच त्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील सोमनाथ लड्डा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.