जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : संजय जगन्नाथ महाजन यास व्यवस्थित ऐकू येत नव्हते. त्याचे कमी अधिक प्रमाणात मानसिक संतुलन देखील बिघडले होते. त्यामुळे त्याच्यावर मानसिक उपचार आणि औषधोपचार सुरु होता. तो त्याची पत्नी सुनिता हिच्या चारित्र्यावर अधून मधून नाहीतर सलग काही दिवस संशय घेत असे. एकंदरीत त्याचे वागणे काही तर्कसंगत नव्हते. आपण आता काय बोललो हे त्याला निट आठवत नाही. पुढच्या क्षणी तो काहीतरी वेगळेच सांगतो. असे त्याचे विचीत्र वागणे होते. त्याच्या वागण्या, बोलण्याला त्याची पत्नी व मुले वैतागली होती.
रावेर या तालुक्याच्या गावी सप्तश्रृंगी नगरात संजय महाजन हा त्याची पत्नी सुनिता, दोन मुले स्वप्निल आणि चंदन तसेच एक मुलगी चेतना असे रहात होते. लग्न समारंभात स्वयंपाक करण्यासाठी सुनिता जात असे. स्वयंपाकाच्या कामातून अर्थार्जन करत ती आपल्या संसाराला हातभार लावत होती. तिची दोन्ही मुले देखील मोलमजुरी करुन घरखर्चाला हातभार लावतात. मोठा मुलगा स्वप्नील हा रावेर शहरातील एका प्लायवूडच्या दुकानावर व त्याचा लहान भाऊ चंदन एका मेडीकल स्टोअरवर कामाला जात असतो. या दोघा भावांची बहिण चेतना ही जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात बीएसस्सी या विद्याशाखेत शिक्षण घेत आहे. एकंदरीत मोलमजुरी करुन या परिवाराचा रहाटगाडा सुरु होता. मात्र या परिवाराची प्रमुख व्यक्ती संजयमुळे घरातील सर्वच जण वैतागले होते. संजय महाजन हा त्याची पत्नी सुनितासोबत नेहमी वाद घालत असे. आई बापाच्या रोजच्या भांडणाची दोघा मुलांना जणू सवय झाली होती. त्यामुळे दोन्ही भाऊ सकाळी नऊ वाजेनंतर आपापल्या नोकरीच्या जागी निघून जात होते.
मानसिक विकृती जडलेला संजय महाजन हा पत्नी सुनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे मानसिक शांतता लाभण्यासाठी ती प्रजापती ब्रम्हकुमारी इश्वरीय संस्थेत जाऊन ध्यान आराधना करत असे. मात्र घरी आल्यावर तिचा पतीपासून होणारा त्रास काही केल्या सुटत नव्हता. असेच दिवसामागून दिवस पुढे पुढे जात होते. 3 मार्च रोजी नेहमीप्रमाणे संजय महाजन हा पत्नी सुनितासोबत वाद घालत होता. नेहमीचा वाद असल्यामुळे सकाळी नऊ वाजेनंतर स्वप्निल आणि चंदन हे दोन्ही भाऊ दुर्लक्ष करत आपापल्या नोकरीच्या जागी निघून गेले. मात्र आजचा दिवस आपल्या आईच्या जीवनातील अखेरचा दिवस असेल याची कल्पना देखील दोघा भावांनी केली नव्हती. मात्र या दिवशी अघटीत झाले.
दुपारच्या वेळी घाईगर्दीत संजय महाजन विक्षीप्त अवस्थेत त्यांचा लहान मुलगा चंदन काम करत असलेल्या मेडीकल दुकानावर सायकलीने आले. आल्या आल्या चंदन यास त्यांनी म्हटले की घरी काहीतरी मोठे झाले आहे. मला जे करायचे आहे ते मी केले आहे. तु घरी जाऊन पाहून घे, आता मी चाललो निघून. असे म्हणत त्याच्या हवाली सायकल करुन ते कुठेतरी निघून गेले. जन्मदात्याचे असले विक्षिप्त बोलणे ऐकून आणि निघून जाणे बघून चंदन मनातून घाबरला. त्याने हा प्रकार लागलीच आपला मोठा भाऊ स्वप्नील यास कळवला. त्यावेळी दुपारचा एक वाजला होता. त्यावेळी स्वप्निल हा नुकताच प्रजापती ब्रम्हकुमारी संस्थेत जेवण करुन दुकानावर काम करण्यासाठी परत आला होता. काहीतरी अघटीत झाल्याचे एव्हाना स्वप्नीलच्या लक्षात आले होते. त्याने लागलीच सायकलने घर गाठले. घराचा दरवाजा लोटलेला होता. दार उघडून स्वप्नील आत गेला. आत जावून बघताच त्याचे मन हेलावले. त्याला दरदरुन घाम फुटला. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. समोर पाहिलेले दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन जणू काही सरकली होती.
स्वप्नीलची आई सुनिता रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाक घरात खाली कोसळलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिच्या डोक्यातून रक्त वहात होते. तिचा डावा डोळा सुजलेला व काळा – निळा पडलेला होता. तिच्या गळ्याभोवती रक्त लागलेले त्याला दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने आईजवळ जाऊन तिला जोरजोरत हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती केव्हाच देवाघरी गेलेली होती. जवळच तुटलेल्या अवस्थेत लाकडी पाट पडलेला होता. त्याच्या आईच्या हातातील बांगड्या व काचेची बरणी फुटून पडलेली होती. चष्मा देखील पडलेला होता. एकंदरीत हा हत्येचा प्रकार असल्याचे त्याच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्याला दरदरुन घाम फुटला. त्याने स्वत:ला कसेबसे सावरत लहान भाऊ चंदन यास फोन लावून घरातील हकीकत कथन करत तात्काळ जसा असेल तसा घरी परत ये असे सांगितले.
मोठ्या भावाचा कापरा आवाज ऐकून चंदन लागलीच घरी आला. तो देखील स्वयंपाक घरातील दृश्य बघून पार हादरला. मात्र परिस्थिती हाताळणे आता दोघा भावांच्याच हातात होती. हे जग पुरेसे समजले नसतांना दोघा भावांसमोर बिकत परिस्थिती ओढवली होती. त्यांची आई हे जग सोडून आणि बाप हत्या करुन पलायन करत घरातून निघून गेला होता. या घटनेची वार्ता गावात पसरण्यास वेळ लागला नाही. कुणीतरी या घटनेची माहिती रावेर पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच फैजपूर उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे, रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, मनोहर जाधव, हे.कॉ. बिजु जावरे, पोलिस कर्मचारी सचिन घुगे आदींचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा आदी कायदेशीर सोपास्कार पुर्ण करण्यात आले. स्वप्निल संजय महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार या हत्येप्रकरणी संजय महाजन याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 70/22 भा.द.वि. 302 नुसार नोंदवण्यात आला. रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अन्वेशन पथकाने फरार संजय महाजन यास तासाभरातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून शोधून काढले. त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन व तात्रीक तपासाच्या आधारे पळून जाण्यापुर्वीच संजयला ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले. पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, हे.कॉ. बिजु जावरे, सचिन घुगे, प्रमोद पाटील, समाधान ठाकूर आदींनी त्याला शोधण्याकामी परिश्रम घेतले.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संजय हा पत्नी सुनितासोबत काही ना काही कारणावरुन वाद घालत होता. तो तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. 2 मार्चच्या रात्री देखील दोघात वाद झाला होता. यावेळी त्याने पत्नी सुनिताला जिवे ठार करण्याची धमकी दिली होती असे समजते. 3 मार्चच्या दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास त्याने पत्नी सुनिताच्या डोक्यात लाकडी पाट मारुन तसेच गळा आवळून ठार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे करत आहेत.