मालेगाव : दरोड्यातील संशयीत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करणा-या दोघा पोलिस कर्मचा-यांवर गोळीबार करणा-यांविरुद्ध आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सरदार नगर परिसरात झालेल्या गोळीबारीच्या घटनेत दोघे पोलिस कर्मचारी बचावले असून संशयित अंधाराचा फायदा घेत पलायन करण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत.
यंत्रमाग कारखानदाराची लुट झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे. या लुटीतील इतर संशयीत सरदार नगर परिसरात फिरत असल्याची माहिती एलसीबी पथकाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे हवालदार गिरीश निकुंभ व पोलिस नाईक सुभाष चोपडा हे त्यांच्या शोधात होते. दरम्यान दोघा कर्मचा-यांच्या नजरेत संशयित जमाल बिल्डर व सलमान असे दोघे आले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु असतांना जमाल बिल्डर याने त्याच्याकडील गावठी पिस्टलचा धाक दाखवत एक राऊंड फायर केला. या झटापटीत दोघे संशयीत फरार होण्यात यशस्वी झाले. गोळीबारीच्या घटनेत दोघे पोलिस कर्मचारी बचावले आहेत. हवलदार गिरीश निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.