जळगाव : भुसावळ जळगाव दरम्यान महामार्गावरील वाघूर नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहात सासू-सून वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. वाघूर धरणातून पाण्याचा प्रवाह नदीत सोडण्यात आला आहे. त्या प्रवाहात दोन्ही महिला वाहून गेल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाण्यात वाहून गेलेल्या सासू-सुनेचा शोध घेतला जात आहे. सिंधूबाई अशोक भोळे (६५) आणि योगिता राजेंद्र भोळे (३५) या दोन्ही महिला आज सकाळी बांधण्यात आलेल्या नव्या पुलाकडे गेल्या होत्या. दोन्ही महिला दररोज या भागात जाऊन वाळू गाळण्याचे काम करत होत्या.
धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढत गेला. त्यामुळे त्या घाबरून सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करत मदतीसाठी याचना करु लागल्या. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या वाहून गेल्या. घटनेच्या वेळी पुलावर हजर असणाऱ्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. काही मिनिटात त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
सिंधूबाई अशोक भोळे यांची योगिता राजेंद्र भोळे ही सूनबाई होती. साकेगाव येथील मशिदीच्या मागे त्या रहात होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे नदी पात्रात वाळू गाळून त्या चरितार्थ चालवत होत्या. दोन्ही महिला विधवा आहेत. योगिता हिस एक मुलगा व एक मुलगी असून ते शाळेत जातात. आजच्या दुर्घटनेत त्या मुलांची आई व आजी वाहून गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.