केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-यास अटक

जळगाव : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर लिंक पाठवून फसवणूक करणा-यास जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने ओरिसा राज्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. कॉंग्रेस नारायण कुढेही (26) रा. पंडापदर ता. रामपूर जिल्हा कालाहंडी ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

सौ. अनुपमा प्रभात चौधरी रा. अमृत स्वरुप गजानन कॉलनी जळगाव यांना त्यांच्या मोबाईलवर संशयीताच्या मोबाईल क्रमांकावरुन एक लिंक आली होती. केवायसी अपडेट करण्यासाठी ती लिंक अनुपमा चौधरी यांनी ओपन केली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी पलीकडून बोलणा-याने विचारला असता तो सौ. चौधरी यांनी सांगितला. त्यानंतर आपल्या बॅंक खात्यातून दहा हजार रुपये गायब झाल्याचे सौ. चौधरी यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

भा.द.वि. 420 सहकलम 66(क) (ग) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला होता. तपासाअंती काँग्रेस नारायण कुढेही (26) रा. पंडापदर ता रामपूर जि कालाहंडी ओरिसा असे संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न झाले. हे. कॉ. महेंद्र पाटील, पो.ना. सलीम तडवी, पो. कॉ. विकास पहुरकर आदींनी ओरिसा येथे जावून संशयीताचा तपास केला. सदर परिसर नक्षलवादी असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील पेहराव वापरुन आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन कॉंग्रेस कुढेही यास ताब्यात घेत अटक करण्यात आली. न्या. विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here