जळगाव : दारुची नियमीत खरेदी करणा-या नेहमीच्या ग्राहकाला यावेळी मोहाची दारु देतो असे सांगून दारु विकत दिली. मात्र मोहाची दारु समजून विकत घेतल्यानंतर प्राशन केलेली दारु ग्राहक तरुणास त्रासदायक ठरली. या दारुमुळे त्याला रक्ताच्या उलट्या होण्यास सुरुवात झाली. याप्रकरणी दारु विक्री करणा-या महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर रमेश भोळे (32) या मजूर तरुणाला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो जळगाव शहरातील मंगलपुरी भागातील पुष्पा ठाकुर या दारु विकणा-या महिलेचा नियमीत ग्राहक आहे. तो तिच्या अड्ड्यावर नेहमी दारु खरेदी करण्यास जात असतो. नेहमीप्रमाणे तो 16 मार्च रोजी दुपारच्या वेळी तिच्या अड्ड्यावर दारु घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी पुष्पा ठाकुरकडील मुलाने यावेळी आपल्याकडे मोहाची दारु असल्याचे अमर यास सांगितले. मोहाची दारु असल्याचे समजून ती प्राशन केल्यानंतर अमर यास रक्ताची उलटी झाली. घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याच्या भावाने त्याला सामान्य रुग्णालयात व नंतर गोदावरी हॉस्पीटलमधे उपचारार्थ दाखल केले.
शुद्धीवर आल्यानंतर त्याने पुष्पा ठाकुर व तिच्या अड्ड्यावरील प्रकाश नावाचा मुलगा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विषारी दारु प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आरोपीस पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सुधीर साळवे, सतीश गर्जे, दत्तू बडगुजर, मंदा बैसाणे आदींनी रामेश्वर कॉलनी भागातून अटक केली. तिला न्या. चषक यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सदर महिलेवर यापूर्वी दारुबंदीचे तीन गुन्हे दाखल आहेत.