औरंगाबाद : नकली डिवायएसपीच्या रुपात बारिक हेअर कट आणि हातात पोलिसाची फायबर काठी घेऊन अंगात पोलिसीपणा आणत धिंगाणा घालणा-या बाविस वर्षाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले. या नकली पोलिस अधिका-याने मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौक ते निराला बाजारपर्यंत हॉटेल बंद करण्यासाठी सक्ती केली. याशिवाय रस्त्याने पायी चालणा-या पादचा-यांवर रुबाब सुरु करत शिवीगाळ केली.
सर्वसामान्य नागरिकांनी या नकली पोलिस अधिका-याचा रुबाब सहन केला. मात्र राजकीय पदाधिका-याच्या वाढदिवसानिमीत्त जमा झालेल्या कार्यकर्त्यांसह जमलेल्या तरुणांनी त्याला चोप दिल्यानंतर मात्र तो नकली अधिकारी त्याच्या दोघा साथीदारांसह पळून गेला. संकेत पंडीत जाधव असे नकली डीवायएसपीचे तर दिनेश गर्दी आणि ऋषीकेश गव्हाणे असे त्याच्या साथीदारांचे नाव असल्याचे समजते. जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अनंता तांगडे यांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची दारुची झिंग कमी झाली. एका फरार साथीदाराचा शोध सुरु होता.