जालना : घनसांगवी तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा येथे रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लुटमार करण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करतांना एक गंभीर जखमी झाला आहे. अमोल काशीनाथ गवते असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. अमोल काशीनाथ गवते यांच्या घराच्या बाहेरील दरवाजाचा कडीकोयंडा टॉमीच्या साहाय्याने तोडून दहा ते बारा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. अमोलचे आई वडील व लहान भाऊ बाहेरगावी गेले असल्यामुळे अमोल व त्याची पत्नी असे दोघेच जण घरात होते.
दरोडेखोर घरात आले तेव्हा अमोलला जाग आली. दरोडेखोरांना प्रतिकार करत असतांना त्याने मदतीसाठी खिडकीतून आरडाओरड सुरु केली. दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यात रॉड व पोटात चाकूचा घाव घातल्याने अमोल जखमी झाला. इतर दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत कपाटातील 2 लाख 87 हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याची तीन तोळ्यांची एकदाणी, एक तोळ्याचे झुंबर, दोन तोळ्यांचा नेकलेस असा एकूण 5 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाले. जाण्यापुर्वी त्यांनी अमोल व त्याच्या पत्नीला बाथरुममधे कोंडले.
दुसऱ्या घटनेत बाजूलाच असलेल्या प्रवीण तांगडे यांच्या बंगल्याच्या खिडकीतून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. त्यांच्या बेडरुममधील कपाटात असलेले 15 हजार रुपये रोख व सोन्याचे पाच ग्रॅमचे वेल, कानातील पत्ती चार ग्रॅम, दोन बाळ्या चार ग्रॅम व सव्वा तोळ्याचे गंठण असा एकुण 1 लाख 40 हजारांचा ऐवज लुटून नेत पलायन केले. तांगडे यांचे कुटुंब वरच्या मजल्यावर झोपले असल्यामुळे चोरीचा प्रकार त्यांना उशीरा समजला.